सोपो कर वसुलीतून मिळालेले 17 लाख लंपास केलेल्या कर्मचाऱ्यास अखेर अटक

0
2

मडगाव नगरपालिकेच्या फेस्ताच्या फेरीतून सोपो कर रुपाने गोळा केलेली 17 लाखांहून अधिकची रक्कम घेऊन फरार झालेल्या योगेश शेटकर या पालिका कर्मचाऱ्याला पकडण्यात काल यश मिळाले. गुरुवारी पहाटे 2 वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर मडगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी काल दिली.

जुन्या बाजारात पुरुमेताच्या फेस्ताच्या वेळी भरण्यात आलेल्या फेरीतील दुकानदारांकडून सोपो कर गोळा करण्याची जबाबदारी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी योगेश शेटकर या कर्मचाऱ्यावर सोपविली होती. गोळा केलेली रक्कम त्याच दिवशी पालिकेच्या तिजोरीत जमा करण्याची सूचना त्याला केली होती. त्याने 229 दुकानदारांकडून 28.70 लाख रुपये गोळा केले आणि त्यातील काही रक्कम जमा केली. काही दिवसांनी हिशेब केला असता 21 लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत भरले नसल्याचे दिसून आले. ती रक्कम जमा करण्याची ताकीद दिली असता काही दिवसांनी त्याने 3 लाख रुपये भरले. मात्र 17 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्याने भरलीच नाही आणि तो रजेवर गेला. वारंवार मुदत देऊनही रक्कम न भरल्याने पालिकेने फसवणुकीची तक्रार मडगाव पोलीस स्थानकात नोंदविली. त्या दिवसांपासून योगेश शेटकर हा फरार झाला होता. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते; पण तो पोलिसांना गुंगारा देत पुणे, मुंबई, बेळगाव येथे फिरत होता. काल पहाटे त्याला मडगाव रेल्वे स्थानकावर पकडून नंतर रितसर अटक केली. त्याला मडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.