सोनसडा कचर्‍याला पुन्हा भीषण आग

0
190

>> वीज वाहिनीच्या लोखंडी सळईला स्पर्शामुळे आग; एक जखमी

सोनसडा येथील कचर्‍याची पहाणी करताना लोखंडी सळईचा स्पर्श ३३ केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनाला झाल्याने त्या आगीची ठिणगी कचर्‍यावर पडून क्षणार्धात कचर्‍याने पेट घेला. तसेच वीज वाहिनीचा धक्का लागून वैभव फटवाल (४५) हा कर्मचारी भाजला. त्याला गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल केले आहे. ही घटना काल दुपारी १.३० वा. च्या दरम्यान घडली. जिल्हाधिकारी अजित रॉय तसेच आमदार चर्चिल आलेमाव, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी घटनास्थळी पाहणी केली.

सोनसड्यावरील कचर्‍याचे ढिगारे रस्त्यापासून बरेच उंचपर्यंत पोहचले असून लाखो टन असल्याचा अंदाज केला जातो. गोवा उच्च न्यायालयाने हे प्रकरण गंभीरपणे घेवून शुक्रवारपर्यंत नवीन जागेसंबंधी सविस्तर माहिती मागविली आहे. दरम्यान, घनकचर्‍याचा अंदाज घेण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाने यांत्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. काल दुपारी सर्वेक्षण करीत असताना वरील घटना घडली. सर्वे विभागाचा एक कर्मचारी वैभव फटवाल उंच लोखंडी सळई घेवून काम करीत असताना तिचा उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श होऊन जोराची ठिणगी उसळून कचर्‍यावर पडली तसेच लोखंडी सळईतून विद्युत प्रवाह येवून फटवाल ४० टक्के भाजला आहे.
कचर्‍याचे भले मोठे ढिगारे उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांपर्यंत पोहचले आहेत. वीजवाहिन्याही खाली आल्याने पालिका व वीज खात्याच्या निष्काळजीपणा तितकाच जबाबदार असल्याचे तेथील लोकांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांची भेट
जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली व आपत्तकालीन व्यवस्थापनाला ती आग विझविण्याच्या सूचना दिल्या. मडगाव, वेर्णा, फोंडा, कुडचडे येथून अग्निशामक दलाला पाचारण करून ती विझविण्याचे काम जोरात चालू झाले तसेच माती आणून आगीच्या ठिकाणी टाकून ती विझविण्याचे काम चालू होते.
आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, आमदार चर्चिल आलेमाव, मडगाव नगराध्यक्ष पूजा नाईक यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. चर्चिल आलेमाव यांनी मुख्याधिकारी जबाबदार असल्याचे सांगितले. तर आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आग विझविण्याचे काम आधी झाले पाहिजे. सरकारने वीज खात्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. अग्निशामक दलाचे उपसंचालक नितीन रायकर यांनी सांगितले, सात बंब व जवान आग विझविण्यात गुंतले आहेत. तर सायंकाळी उशिरापर्यंत ७० हजार लिटर पाणी वापरले आहे. गेल्या मे महिन्याच्या अखेरीस लागलेली आग विझविण्यासाठी वीस दिवसांपेक्षा जास्ती दिवस लागले होते. कित्येक कुटुंबांना तेथून अन्यत्र हलविण्यात आले आहे.

वार्‍यामुळे आग पसरली
भर दुपारी सोसाट्याच्या वार्‍यामुळे कचर्‍याला लागलेली आग क्षणार्धात सर्वत्र पसरली. आगीचे लोट वरपर्यंत पसरले होते व सर्वत्र धुराचा फैलाव झाल्याने त्या परिसरात फिरणे कठीण झाले. परिसरातील मनोविकास स्कूलच्या विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आले.