सोईस्कर दिब्रिटो

0
192

उस्मानाबादेत झालेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आपल्या अध्यक्षीय भाषणातून संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ‘लेखकाला हुजर्‍याची भूमिका पार पाडायची नसते, तर द्रष्ट्याची भूमिका पार पाडायची असते’ असे खडे बोल साहित्यिकांना सुनावताना देशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी, माध्यम स्वातंत्र्य, हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल, अशा अनेक विषयांना स्पर्श करत मराठी भाषेच्या भवितव्यापासून पर्यावरण रक्षणापर्यंत नानाविध विषयांचा उहापोह केला. अर्थात, देशातील विद्यमान परिस्थितीबाबतची फादर दिब्रिटोंची मते काही नवी नाहीत. त्यांची अशी त्यावर एक भूमिका आहे आणि वेळोवेळी ते स्पष्टपणे ती मांडत आलेले आहेत. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना त्यांनी खरमरीत पत्रही यापूर्वी पाठवलेले होते. त्यामुळे आपली ही विशिष्ट भूमिका मांडण्यासाठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचाही वापर त्यांनी केला हे स्वाभाविक आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्यिक येऊ नयेत अशी मागणी केली जात असली, तरी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय विषय येऊ नयेत असे कोणी म्हणत नाही, कारण शेवटी राजकारण हा आपल्या जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्शणारा विषय आहे आणि साहित्यिकही त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही. मुळात समाजाचे हित साधणे म्हणजे स – हित हीच साहित्याची व्याख्या आहे. त्यामुळे ज्या गोष्टींमध्ये समाजाचे हित नाही, त्याविरुद्ध स्पष्टपणे बोलण्यासाठी लागणारा ताठ कणा साहित्यिकांपाशी असायलाच हवा. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या आपल्या भाषणातून जे परखड बोल दिब्रिटो यांनी सुनावले आहेत, ते त्यांचे एक विचारवंत या नात्याने कर्तव्यच होते. ‘लोकशाहीच्या नावे हुकुमशाही अवतरत तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे. अशावेळी मौन राखणे हा भेकडपणा आहे’ हे सगळे खरे, परंतु दिब्रिटो यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केलेली काही विधाने मात्र सोईस्कर वाटतात हेही तितकेच खरे आहे. मराठी भाषेच्या भवितव्यासंबंधी बोलत असताना एके ठिकाणी त्यांनी ‘परकीय मिशनरी मराठी भाषेची सेवा करीत होते’ असे विधान केले आहे. फादर दिब्रिटोंचे हे विधान आक्षेपार्ह आहे. मिशनर्‍यांनी जी काही साहित्यनिर्मिती केली, ती काही मराठीच्या प्रेमापोटी केली नाही. एतद्देशियांमध्ये आपला धर्मप्रसार करण्यासाठी साधन म्हणून ते येथील भाषा शिकले आणि त्यासाठीच त्यांनी देशी भाषांतून ‘साहित्य’ निर्मिले. हे जे तथाकथित साहित्य आहे, ते देखील जुन्या हिंदू धर्मग्रंथांचे भ्रष्ट अनुकरण आहे. ज्या फादर थॉमस स्टीफन्सचा ते हवाला देतात त्या स्टीफन्सने मराठीच्या महतीच्या ज्या ओव्या आपल्या ख्रिस्तपुराणात दिल्या आहेत, त्या योगवासिष्ठ्यातून केवळ काही शब्द इकडचे तिकडे करून उचललेल्या आहेत हे वास्तव आहे. जोरजुलमाच्या बळावर धर्मांतरे घडविल्यानंतर नवख्रिस्त्यांची पोथ्यापुराणांची गरज भासवण्यासाठी मिशनर्‍यांनी हिंदू पोथ्यापुराणांशी साधर्म्य राखणारी ग्रंथनिर्मिती केली. तिला मराठीच्या सेवेचा मुलामा दिब्रिटोंनी देऊ नये. दिब्रिटो आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद करतात त्याप्रमाणे, फादर स्टीफन्सने ‘म्हणोनि आमी तुमी सर्व जनी | बंधुवर्ग ऐसे मानावे मनी | फिंग्री हिंदू आदी करुनि | एकमेकांचे बंदू’ असे भले म्हटले असेल, परंतु त्यामुळे गोव्यामध्ये इन्क्विझिशनने केलेल्या अमानुष जुलमांचा इतिहास नजरेआड होत नाही. त्या जोरजुलमाबाबत, सक्तीच्या धर्मांतरांबाबत, धर्मच्छळाबाबत दिब्रिटोंना काय म्हणायचे आहे? ते ज्या पोथ्यापुराणांच्या, धर्मग्रंथ वचनांच्या चिकित्सेची अपेक्षा करतात, त्यामध्ये बायबलही येत असेलच. साहित्यिक, विचारवंतांच्या जोडीला ते धर्माचार्यांनीही भूमिका घेतली पाहिजे असे ते म्हणतात ते चर्चच्या राजकीय सहभागाशी अनुरूपच आहे. दिब्रिटो आपल्या भाषणात असेही म्हणाले आहेत, ‘‘मायबोलीवर कसे प्रेम करावे, हे गोव्यातील कोकणी भाषक लोकांकडून आपण शिकू शकतो. गेल्या पन्नास – साठ वर्षांत कोकणी भाषकांनी आपल्या मायबोलीला वैभव प्राप्त करून दिले आहे. शासनाकडे आशाळभूत नजरेने न पाहता, प्रसंगी शासनाची उदासीनता असतानाही, त्यांनी कोकणी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. स्वबळावर पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली. व्याकरणाचे पुस्तक उपलब्ध नसताना श्री. सुरेश बोरकर ह्यांनी व्याकरण रचले… प्राथमिक शाळेत कोकणी माध्यम आणि पुढे इंग्रजी माध्यम असा प्रयोग गोव्यात सुरू आहे.’’ ही विधाने दिब्रिटोंच्या तोंडी भरवली गेल्यासारखी वाटतात. कोकणी माध्यमाच्या शाळा सरकारी अनुदान मिळताच एका रात्रीत कशा इंग्रजी माध्यमाच्या झाल्या हे वास्तव दिब्रिटोंच्या गावी नसावे व त्याविरुद्ध अवाक्षर काढण्याची गरज त्यांना वाटत नसावी. कोकणी चळवळीतील झुंजारपणा हरवून आत शिरलेली सरकारी अनुदाने आणि पुरस्कारांवर अवलंबून राहण्याची ‘आशाळभूत’ मानसिकता आणि मराठी भाषकांनी गोव्यामध्ये सततच्या गळचेपीविरुद्ध चालवलेला संघर्ष दिब्रिटोंना दिसला नाही हेही आश्चर्यच!!