सैफच्या प्रकृतीत सुधारणा; 2 दिवसांनंतरही हल्लेखोर मोकाटच

0
1

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणातील गुन्हेगार पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. दोन दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांचे हात रिकामे आहेत. पोलिसांची तब्बल 35 पथके आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी एका संशयिताला गिरगावातून ताब्यात घेतले होते. त्याची कसून चौकशी करण्यात आली; पण हल्लेखोर तोच आहे का, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. दुसरीकडे सैफवर काही शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता त्याची प्रकृती सुधारत आहे.
मुंबईतील वांद्रे परिसरातील घरात गुरुवारी पहाटे 2.30 च्या सुमारास सैफ अली खानवर हल्ला झाला होता. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार चालू आहेत. सैफच्या प्रकृतीबाबत एक आरोग्य बुलेटिन जारी करण्यात आले आहे. रुग्णालयाचे प्रमुख न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितले की, सैफला आयसीयूमधून एका खास खोलीत हलवण्यात आले आहे. सध्या सैफ पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. सैफ स्ट्रेचरशिवाय स्वतःहून रुग्णालयात गेला. त्यावेळी तैमूरही त्याच्यासोबत होता. पाठीतून चाकूचा तुकडा काढून टाकला आहे. चाकू त्याच्या मणक्यात 2 मिमी आणखी खोल असता, तर पाठीच्या कण्याला गंभीर नुकसान झाले असते, असे डॉक्टरांनी सांगितले.
सैफच्या हातावर दोन जखमा होत्या, तर मानेवर एक जखम होती ज्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे आणि पाठीच्या कण्याजवळ अडकलेला चाकूचा तुकडा शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला आहे, असे डॉ. नितीन डांगे म्हणाले. सैफला संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी डॉक्टरांनी व्हिजिटर्सला येण्यास बंदी घातली आहे. त्याला 2-3 दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाईल, त्यानंतर डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला जाईल.

अद्याप कोणालाही अटक नाही : मुंबई पोलीस
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही; अशी माहिती मुंबई दिली. सकाळी एका संशयिताची चौकशी करण्यात आली होती, तेव्हा काही माध्यमांनी ‘एक आरोपी अटकेत’, ‘एक आरोपी ताब्यात’ अशा बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यानंतर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. हल्लेखोराला पकडण्यासाठी आमची वेगवेगळी पथके अथक प्रयत्न करत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.