सैन्यातही आता काही प्रमाणात राजकारण सुरू झाले असून सैन्याला नेहमी राजकारणापासून अलिप्त ठेवायला हवे. सशक्त लोकशाहीसाठी ही बाब महत्वाची असल्याचे मत देशाचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी येथील एका समारंभात बोलताना व्यक्त केले.
या विषयावर अधिक मतप्रदर्शन करताना रावत यांनी सांगितले की, आतापर्यंत आम्ही सैन्य दलांमध्ये बर्याच प्रमाणात धर्मनिरपेक्ष वातावरण ठेवले आहे. मात्र अलीकडे सैन्यात काही प्रमाणात राजकारणाचा समावेश होऊ लागला आहे. भारतातील लोकशाही व्यवस्था सशक्त असली तरी सैन्याला राजकारणापासून अलिप्त ठेवणे महत्वाचे आहे. जुन्या आठवणी सांगताना ते म्हणाले की, पूर्वी सैन्यात स्त्रिया व राजकारण यावर चर्चा होत नव्हती. परंतु आता याच विषयांवर सैन्यात चर्चा मोठ्या प्रमाणात होत असल्याने ते टाळायला हवे असे ते म्हणाले. राजकारण्यांकडून कोणत्याच बाबतीत सैन्यात ढवळाढवळ होत नसते तेव्हाच ते सर्वोत्तम कामगिरी बजावतात असा दावाही त्यांनी केला.