सेवेतून कमी केलेल्या आयपीएचबीच्या कंत्राटी कामगारांची पणजीत निदर्शने

0
35

बांबोळी येथील मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था (आयपीएचबी) या सरकारी इस्पितळातील कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांनी येथील आझाद मैदानावर काल निदर्शने करून सेवेत पुन्हा सामावून घेण्याची मागणी केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते मायकल लोबो, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी निदर्शने करणार्‍या कंत्राटी कामगारांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली.

बांबोळी येथे आयपीएचबी इस्पितळात कंत्राटी पद्धतीवर गेली नऊ वर्षे सेवा बजावलेल्या २८ कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या कर्मचार्‍याची २०१४ मध्ये कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या काळात सुद्धा या कामगारांनी अखंडित सेवा बजावली आहे, अशी माहिती निदर्शने करणार्‍या कंत्राटी कामगारांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर आयपीएचबी इस्पितळातील कंत्राटी कामगारांचा प्रश्‍न मांडण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे सेवा बजावणार्‍या या कामगारांना अचानक सेवेतून कमी करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.