शिरोडा येथील सरकारी आरोग्य केंद्राच्या डॉ. अक्षया पावस्कर (38) यांचे काल मंगळवार रात्री (दि. 15) ड्युटीवर असताना हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले.
मंगळवारी रात्री ड्युटीवर असताना डॉ. अक्षया पावस्कर यांनी आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या कित्येक रुग्णांची तपासणी केली. त्यानंतर त्या आराम करण्यासाठी इस्पितळातील खोलीत गेल्या. रात्री 9 च्या दरम्यान आणखी रुग्ण आल्याने परिचारिकेने खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे परिचारिकेने त्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल केला; पण तरीही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे परिचारिकेने दरवाजा उघडून खोलीत प्रवेश केला असता त्या निपचित पडलेल्या आढळून आल्या. यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह उतरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला.
डॉ. अक्षया पावस्कर यांची एक सेवाभावी डॉक्टर अशी ओळख होती. कोरोना काळात त्यांनी रुग्णसेवेत स्वतःला झोकून देऊन काम केले होते. त्यामुळे त्या कोरोना योद्धा ठरल्या होत्या. त्या मळकर्णे-फोंडा येथे वास्तव्यास होत्या. त्यांच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. अक्षया पावस्कर या एक उत्कृष्ट कवयित्रीही होत्या. 2020 साली क्रेव्हन आर्ट्स कौन्सिलच्या कविता स्पर्धेत त्यांना पुरस्कार प्राप्त झाला होता.