सेरेंडिपीटी महोत्सवातील तात्पुरत्या नाट्यगृहाला आग

0
4

>> पणजीतील आयनॉक्सजवळील घटना

>> घटनेत कुठलीही जीवित हानी नाही

>> नुकसानाचा अंदाज नाही

पणजीतील आयनॉक्स मल्टिप्लेक्ससमोरील मोकळ्या जागेत सेरेंडिपीटी कला महोत्सवासाठी तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या सेटला काल रविवारी संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान आग लागल्याने सदर नाट्यगृहाचा सेट या आगीत जळून खाक झाला. मात्र सुदैवाने या आगीत जीवितहानी अथवा कुणीही जखमी होण्याची घटना घडली नाही. तेथे काम करण्यासाठी हजर असलेल्या कामगारांनी प्रसंगावधान राखून वेळीच धाव घेऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.

जेथे ही आग भडकली त्या नाट्यगृहापासून पणजी मल्टिप्लेक्सची इमारत अवघ्या पाच मीटरच्या अंतरावर असून आग भडकली तेव्हा मल्टिप्लेक्समधील सर्व चारही चित्रपटगृहात चित्रपटाचे खेळ सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून ‘सेरेंडिपीटी’ या कला महोत्सवासाठीची साधनसुविधा आयनॉक्स जवळच उभारण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे.

वेल्डिंगमुळे आग
आयनॉक्स थिएटर तसेच वारसा इमारत असलेल्या जुन्या गोमेकॉ इमारतीच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत सेरेंडिपीटी महोत्सवासाठी एक भव्य असे तात्पुरते नाट्यगृह उभारण्याचे काम गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे. काल तेथे वेल्डिंगचे काम चालू असताना आग भडकल्याने या थिएटरने पेट घेतला. जवळ-जवळ आयनॉक्स थिएटर इमारतीएवढ्या उंचीच्या या तात्पुरत्या थिएटरला आग लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. आग लागली तेव्हा या परिसरात मोठ्या संख्येने कामगार हजर होते. त्यांनी धावपळ करून पाणी आणून आग आटोक्यात आणली.

काही वेळाने पणजी अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोचल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने पावले उचलत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. आगीमुळे सेरेंडिपीटी महोत्सवाच्या आयोजकांचे मोठे नुकसान झालेले असले तरी नुकसानीचा आकडा सांगण्यास त्यांनी नकार दिला.
दै. नवप्रभाशी बोलताना आयोजकांच्या सूत्रांनी या आर्थिक नुकसानीपेक्षा या थिएटरमध्ये आपली कला सादर करण्यासाठी जे प्रतिभावान असे कलाकार येणार होते ते येथे येऊन आता कला सादर करू शकणार नाहीत याचे आम्हाला जास्त दु:ख आहे, असे मत व्यक्त केले. आगीत खाक झालेल्या नाट्यगृहाचे 90% काम पूर्ण झाले होते. वातानुकूलीत यंत्रणा बनवण्याचे काम चालू असताना आग भडकली.
पोलिसांनी ही आग अपघाताने लागलेली असून घातपाताची शक्यता फेटाळून लावली.

आगीला सरकार जबाबदार ः काँग्रेस

आयनॉक्सजवळ तात्पुरत्या उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहाला जी आग लागली त्याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप काल काँग्रेस पक्षाने केला. जेथे हे तात्पुरते नाट्यगृह उभारण्यात येत होते त्याच्या एका बाजूला अगदी जवळ जुन्या गोमेकॉची वारसा इमारत आहे. तर दुसऱ्या बाजूला पणजीचे आयनॉक्स मल्टिप्लेक्स आहे. असे असताना तेथे वेल्डिंगला परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व इतर विभागांची परवानगी आयोजकानी घेतली होती काय, हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. आम्ही मुख्यमंत्री डॉ. सावंत जे गृहमंत्री आणि गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आगीच्या घटनेवर सविस्तर अहवालाची मागणी करत असल्याचे पणजीकर यांनी सांगितले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जे कोण हलगर्जीपणा व आगीच्या घटनेस जबाबदार आहेत अशा सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.