>> कॉंग्रेसची पत्रकार परिषदेत मागणी
सेरुला कोमुनिदाद जमीन घोटाळा प्रकरण सरकारने चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशकडे सोपवावे, अशी मागणी काल कॉंग्रेस प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत केली.
या कोमुनिदादीतील वझरीकर कुटुंबियांच्या आफ्रामेंत जमिनीचे रोहन खंवटे हे महसूल मंत्री असताना अवघ्या एका महिन्यात म्युटेशन करण्यात आले होते अशी माहितीही डिमेलो यांनी यावेळी दिली. अर्जुन वझरीकर यांच्या नावावर ही आफ्रामेंत जमीन असून १९६३ साली त्यांना ही आफ्रामेंत जमीन देण्यात आली होती. अर्जुन वझरीकर यांचे २००५ साली निधन झाले. मात्र, या आफ्रामेंत जमिनीच्या म्युटेशनसाठी २५ ऑक्टोबर २०१७ या दिवशी अज्ञात व्यक्तीने हयात नसलेल्या अर्जुन वझरीकर यांच्या नावाने अर्ज केला होता. हा अर्ज केल्यानंतर अवघ्या एका महिन्यात या जमिनीचे म्युटेशन करण्यात आले होते. त्यावेळी रोहन खंवटे हे राज्याचे महसूल मंत्री होते असे डिमेलो म्हणाले.
यावेळी जमिनीचे म्युटेशन झाले असता अर्जुन वझरीकर यांचे पुत्र संदीप वझरीकर यांना ६ हजार चौ. मी. एवढी जमीन (सर्वात जास्त जमीन) देण्यात आली होती. संदीप हा रोहन खंवटे यांचा मित्र आहे. असा आरोपही डिमेलो यांनी केला. सेरूला कोमुनिदाद घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणारे माजी महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी आपण महसूल मंत्री असताना या घोटाळ्याची चौकशी का केली नाही, असा सवालही डिमेलो यानी केला.
खंवटे याना आव्हान
सेरुला कोमुनीदाद जमीन घोटाळा प्रकरणी आपण रोहन खंवटे यांच्याबरोबर जाहीर युक्तीवादासही तयार असल्याचे डिमेलो म्हणाले व त्यासाठी त्यानी यावे यासाठी आपण त्यांना जाहीर आव्हान देत असल्याचे त्यानी सांगितले.