महाराष्ट्रात युतींमध्ये जागावाटपाचा वाद
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून गेले काही दिवस ताणून धरल्यानंतर शिवसेना-भाजप नेत्यांनी नरमाईने घेत बोलणी सुरू केली असली तरी काल त्यातून कशाचीही एकवाक्यता होऊ शकली नाही. दुसरीकडे कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतही कुरबूर सुरू झाली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने जागावाटप सन्मानपूर्वकरितीने व्हावे असे सांगून कॉंग्रेसला एक दिवसाची मुदत दिली. भाजप नेते विनोद तावडे यांनीही सेना-भाजप युतीबाबतचे अंतिम चित्र २४ तासांत स्पष्ट होईल, असे सांगितले.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीची गेली १५ वर्षे महाराष्ट्रात युती आहे. काल राष्ट्रवादीने कडक पवित्रा घेत दोन्ही पक्षांचा योग्य सन्मान होईल, अशा पद्धतीने जागावाटपाची तरतूद व्हावी अशी मागणी केली.
कॉंग्रेसने देऊ केलेल्या १२४ जागांचा प्रस्ताव अमान्य असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले. राष्ट्रवादीने १४४ जागा मागितल्या असल्याचे ते म्हणाले. २००४च्या निवडणुकीत कॉंग्रेसपेक्षा जास्त जागा असताना राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्रीपद कबूल केले होते. आता कॉंग्रेसची पाळी असून त्यांनी आदरयुक्त पद्धतीच्या जागावाटपाचा प्रस्ताव द्यावा, असे पटेल म्हणाले.
दरम्यान, सेना – भाजपमध्येही जागावाटपाच्या मुद्द्यावर अजून एकमत झालेले नाही. शिवसेनेने नव्याने प्रस्ताव दिला असून त्यानुसार शिवसेना १५५ जागा लढवेल व भाजपला १२५ जागा मिळतील, २८८ एकुण जागांपैकी उर्वरित जागा महायुतीतील अन्य लहान पक्षांना जातील. मात्र हा प्रस्ताव भाजपला अमान्य असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी नेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शाब्दीक चकमकींनंतर मंद पडलेली जागावाटपाची बोलणी परवा उद्धव ठाकरे यांनी पूत्र आदित्य व शिवसेना नेते सुभाष देसाई यांना भाजपचे महाराष्ट्र प्रभारी ओ.पी.माथुर यांच्याकडे पाठविल्यानंतर पुन्हा सुरू झाली होती. १५ ऑक्टोबरला होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर आहे.