सेंट लुसिया झूक्सकडून पॅट्रियोटस्‌चा फडशा

0
91

>> मोहम्मद नबीचे पाच बळी

अफगाणिस्तानचा फिरकीपटू मोहम्मद नबीने केवळ १५ धावांत घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर सेंट लुसिया झूक्सने सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रियोटस्‌चा ६ गड्यांनी फडशा पाडला. या विजयाच्या जोरावर झूक्सने ६ सामन्यांतून आपली गुणसंख्या ८ केली आहे.

झूक्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडल्यानंतर पॅट्रियोटस्ला मोहम्मद नबीने सुरुवातीलाच चार मोठे धक्के दिले. डावातील व आपल्या पहिल्याच षटकात नबीने ख्रिस लिन (०) व निक केली (०) यांना तंबूचा रस्ता दाखवला. डावातील तिसर्‍या व स्वतःच्या दुसर्‍या षटकाच्या पाचव्या चेंडूवर दिनेश रामदिन (९) व सहाव्या चेंडूवर एविन लुईस (१) या दोघांना बाद करत नबीने पॅट्रियोटस्‌ची ४ बाद ११ अशी नाजुक स्थिती केली. जहामार हॅमिल्टन (९) याने बेन डंक (३३) याच्या साथीने काही काळ किल्ला लढवला.

परंतु, अफगाणिस्तानचा चायनामन झहीर खानने त्याला बाद केले. यानंतर ठराविक अंतराने पॅट्रियोटस्‌चे गडी बाद होत राहिले. तळाला कर्णधार रेयाद एम्रिट (१६) व अल्झारी जोसेफ (नाबाद २१) यांनी प्रतिकार केल्याने पॅट्रियोटस्ला शंभरी ओलांडता आली. पॅट्रियोटस्ला ९ बाद ११० पर्यंतच मजल मारता आली. झूक्सकडून नबी व्यतिरिक्त झहीर खान, रहकीम कॉर्नवाल व केसरिक विल्यम्स यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. किरकोळ लक्ष्याचा पाठलाग करताना कॉर्नवालने सुरुवातीलाच फटकेबाजी करत ११ चेंडूंत झटपट २६ धावा केल्या. तिसर्‍या स्थानावरील मार्क दयाल भोपळाही फोडू शकला नाही. रॉस्टन चेजने २७ तर नजिबुल्ला झादरानने २४ चेंडूंत ३३ धावांची भर घातली. झूक्सने १४.४ षटकांत ४ गडी गमावून १११ धावांचे लक्ष्य गाठले. विंडीजच्या देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवी लेगस्पिनर इम्रान खान याने २३ धावांत ३ गडी बाद करत प्रभाव पाडला. बेन डंकने १ बळी घेतला. पॅट्रियोटस्‌चा हा पाच सामन्यांतील चौथा पराभव ठरला.