सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन तयारीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

0
6

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सेंट फ्रांसिस झेवियर अवशेष दर्शन सचिवालय समितीची पहिली बैठक पर्वरीतील मंत्रालयात संपन्न झाली. जुने गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर प्रदर्शन 2024 च्या नियोजन आणि व्यवस्थेवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. हे प्रदर्शन 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 पर्यंत 45 दिवस चालेल.

मुख्यमंत्र्यांनी यात्रेकरूंसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधी जुने गोवा, कुंभारजुवा भागातील सध्याच्या पायाभूत सुविधा, नवीन पायाभूत सुविधांची आवश्यकता, वाहतूक आणि इतर व्यवस्थांचा आढावा घेतला. बैठकीला पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, सचिव (महसूल) संदीप जॅकीस, सरकारी अधिकारी उपस्थित होते.

300 कोटी खर्च होणार

जुने गोवे येथे येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार असलेल्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर अवशेष दर्शन सोहळ्यासाठी अंदाजे 300 कोटी रु. एवढा खर्च येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. खर्चाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्या सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 200 कोटी रु. च्या साधन सुविधेचे काम यापूर्वीच हाती घेण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

भाविकांना या सोहळ्यासाठी नोंदणी यावी यासाठी एक वेबपोर्टल सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नोंदणी करणाऱ्या भाविकांना सरकार निवासाची व्यवस्था यासह अन्य सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करणार असल्याचे ते म्हणाले.

पोपना निमंत्रण
सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या अवशेष दर्शनासाठी गोवा सरकार पोप फ्रान्सिस यांना निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अवशेष दर्शनासाठी कित्येक अतिमहनीय व्यक्ती व आंतरराष्ट्रीय पाहुणे येणार असल्याचेही ते म्हणाले.