सेंट झेवियर शवप्रदर्शन काळात आठ लाख भाविकांची अपेक्षा

0
294

येत्या १४ नोव्हेंबरपासून राज्यात सुरू होत असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर शव प्रदर्शनासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असून या सोहळ्यासाठी विदेशातून जवळ जवळ सहा ते आठ लाख भाविक गोव्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले.
या सोहळ्यासाठी युरोपमधील देशांतून मोठ्या संख्येने भाविक यावेत यासाठी युरोपमधील काही देशांत जाऊन प्रचार करण्याचा पर्यटन खात्याचा विचार होता. मात्र, विदेश दौर्‍यांना जनतेकडून होणार्‍या विरोधानंतर तो विचार बदलण्यात आला. मात्र, तसे असले तरी खात्याने या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने विदेशातून भाविक यावेत यासाठी जाहिरातबाजी करण्यास कोणतीही कसर सोडली नाही. खात्याने विविध साधनांचा वापर करून या सोहळ्यासाठीची मोठी जाहिरातबाजी केली.युनायटेड अरब अमिरात येथील अल् अरेबिया या विमान कंपनीच्या सुमारे ४० लोकांच्या एका शिष्टमंडळाने गोव्यात आणले होते. त्यांना येथे आल्यावर संपूर्ण गोवा दाखवण्यात आला. त्यात समुद्रकिनारे, चर्चेस, मंदिरे, निसर्गरम्य स्थळे आदींचा समावेश होता. गोव्याचे सौंदर्य बघून भारावून गेलेल्या या शिष्टमंडळाने शवप्रदर्शन काळापासून नव्या वर्षापर्यंत अल् अरेबियाच्या विमानातून युरोप व रशिया येथील पर्यटकांना मोठ्या संख्येने गोव्यात आणण्याचे आश्‍वासन दिले आहे, असे परुळेकर यांनी सांगितले.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लाखो पर्यटक
येत्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात गोव्यात सुमारे १५ लाख पर्यटक येण्याची अपेक्षा असून त्यात सुमारे लाख विदेशी पर्यटक असतील असे ते म्हणाले. १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या शवप्रदर्शनासाठीच विदेशातून सुमारे ४ लाख भाविक येणार आहेत. शवप्रदर्शन ४ जानेवारीपर्यंत चालणार आहे. २० ते ३० नोव्हेंबर या दरम्यान इफ्फी असेल त्यासाठीही विदेशी तसेच देशी प्रतिनिधी येणार आहेत. तद्नंतर नाताळ सण होईल. नाताळ व सनबर्न संगीत पार्टी यासाठीही मोठ्या संख्येने देश-विदेशातून पर्यटक येणार आहेत. सर्वांत शेवटी नववर्षासाठी येणार्‍या पर्यटकांचा आकडाही मोठा असेल. हा एकूण आकडा १५ लाखांच्या आसपास असेल, असे ते म्हणाले.
शवप्रदर्शन तयारी अंतिम टप्प्यात
दरम्यान, शव प्रदर्शनासाठीची तयारी सध्या अंतिम टप्प्यात असून पुढील दोन-तीन दिवसांत या तयारीवर अंतिम हात फिरवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील शव प्रदर्शन महोत्सवविषयक उच्चस्तरीय समितीच्या तीन बैठका यापूर्वीच झाल्या आहेत. या समितीत पर्यटन खात्यातील अधिकारी, पोलीस अधिकारी, आरटीओ व राजकीय नेते यांचा समावेश आहे. शवप्रदर्शन स्थळी पदपथ, पार्किंग व्यवस्था, शौचालयांची सोय, वाहतूक व्यवस्था, निवास व्यवस्था, फेरी धक्क्यावर रेम्पची व्यवस्था आदींचा समितीने पूर्ण आढावा यापूर्वीच घेतला आहे. वरील साधनसुविधा उभारण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे, असे परुळेकर म्हणाले.