जल पर्यटनांतर्गत एमपीटीत प्रवासी टर्मिनलचे काम सुरू
सेंट झेवियर शव प्रदर्शन सोहळ्याच्या प्रसिद्धीसाठी सांस्कृतिक मंत्रालयाने रशिया, इंग्लंड, इस्राएल आणि युरोपियन समूहाबरोबर प्रसिद्धीचे काम सुरू केले आहे. यामुळे भारतीय संस्कृती, कला, पुरातत्त्वशास्त्र यांची माहिती जास्तीतजास्त पर्यटकांना होईल, असे केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
जल पर्यटनाला चालना देण्यासाठी ५० जागांची निवड केली आहे. यात नुकताच २७ ऑगस्ट रोजी गोव्यातील मुरगाव पोर्ट ट्रस्ट येथे नवीन पॅसेंजर टर्मिनलचे काम सुरू झाले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
केंद्र सरकारचा १०० दिवसांचा लेखा जोखा मांडताना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने काळाची पाऊले ओळखून माहिती व तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. त्याचाच भाग म्हणून ‘इन्क्रेडिबल इंडिया’ हा मोबाईल ऍप विकसित केला आहे. त्यामुळे परदेशी व देशी पर्यटकांना विविध सेवांची सहज माहिती मिळेल. पर्यटनमंत्रालयाने पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी रेल्वेमंत्रालयाच्या सहकार्याने २४ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी १२.५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने टायर वन व टू शहरांमध्ये विमानतळांचा विकास करण्यात येणार आहे. त्याशिवाय देशभरात विशिष्ट संकल्पना घेऊन पाच पर्यटन स्थळांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
आगामी काळात पर्यटनक्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे व परदेशी पर्यटकांना कुठल्याही अडथळ्याशिवाय देशातील पर्यटन स्थळांचा आनंद घेता येईल अशी व्यवस्था करण्यावर पर्यटन मंत्रालय सध्या काम करत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. सीआयआय कडून अर्जुन शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सीआयआय गोवाचे उपाध्यक्ष पराग जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.