सेंट झेवियर अवशेष दर्शन सोहळ्याचे 95% काम पूर्ण

0
3

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

21 नोव्हेंबरपासून होऊ घातलेल्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या अवशेष दर्शन सोहळ्यासाठीची तयारी जोरात सुरू असून आतापर्यंत या सोहळ्यासाठीचे 95 टक्के काम पूर्ण झालेले असून फक्त 5 टक्के एवढे काम शिल्लक राहिले असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांना दिली. अवशेष दर्शन सोहळ्यासाठीच्या तयारीचा आढावा काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बैठकीत घेतला. या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हेही बैठकीला हजर होते.

या अवशेष दर्शन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायबंदर व चिंबल येथील रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. यंदाचा अवशेष दर्शन सोहळा हा देश-विदेशांतून येणाऱ्या भाविकांसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी त्यांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा पुरवण्यात येणार आहेत. राजधानी पणजी शहरातून भाविकांना जुने गोवे येथे दर्शन सोहळ्याला जाण्यासाठी कदंब बसेसची सोय करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. भाविकांच्या वाहतुकीची सोय, निवासाची सोय, त्यांची सुरक्षा यावर खास लक्ष देण्यात येणार आहे.

1200 स्वयंसेवक

21 नोव्हेंबर ते 5 जानेवारी या दरम्यान चालणार असलेल्या या सोहळ्यासाठी 1200 स्वयंसेवक असतील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.पोलीस खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, अग्निशामक दल यांच्याकडेही आवश्यक ती जबाबदारी सोपवण्यात आलेली असून त्यांना कामे वेगाने करण्याबरोबरच सतर्क राहण्याचीही सूचना करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.