सृष्टीच्या रहस्याचा वेध

0
430
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

रूढार्थाने हे क्रमिक पुस्तक नसून त्याचे उद्दिष्ट काहीसे निराळे आहे. विद्यार्थ्यांना काव्यमाधुरी स्वतंत्र चाखता यावी; आयुष्य आनंदमय, उल्हासमय व सुंदर करण्यास काव्य कसे साहाय्यभूत होते हे त्यांना कळावे व त्यादृष्टीने त्यांनी त्याचे वाचन करावे या हेतूने प्रस्तुतचा कवितासंग्रह तयार करण्यात आला आहे…

ते पाऊल कोणाचे?
पद (चाल ः- सृष्टीचा लडिवाळ बाळ)
गगनाच्या अंगणीं| उमटतें पाउल शुभलक्षणी॥
नाजुक गोंडस असें कुणाचें सांगा मजला कुणी॥
संध्यारागांतुनी| तयाचा तळ दिसतो साजणी॥
स्वर्गंगेसम रेषा दिसती कधीं-कधीं ज्यांतुनी॥
पाऊल पडतांक्षणीं| जाहली तुटातूट पैंजणीं॥
कांहीं अस्ताव्यस्त विखुरले नक्षत्रांचे मणी॥
कांहीं उरले गुणीं| तयांतुनि रुणझुण उठतो ध्वनी॥
कानीं येतो अव्यक्ताच्या तो अवकाशांतुनी॥
गगनीं एके क्षणीं| दुज्या तें उठतें क्षितिजांतुनी॥
पाउल दिसतें परी तयाचा कोण असावा धनी?॥

  • साधुदास
    जुनी पाठ्यपुस्तके न्याहाळत असताना प्रो. श्री. बा. रानडे आणि गं. दे. खानोलकर यांनी संपादित केलेले ‘महाराष्ट्र-रसवंती-भाग तिसरा’ हे पुस्तक हाती आले. १९३५ साली प्रथमतः प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचे ते १९५० मधील पुनर्मुद्रण आहे. रूढार्थाने ते क्रमिक पुस्तक नसून त्याचे उद्दिष्ट काहीसे निराळे आहे. विद्यार्थ्यांना काव्यमाधुरी स्वतंत्र चाखता यावी; आयुष्य आनंदमय, उल्हासमय व सुंदर करण्यास काव्य कसे साहाय्यभूत होते हे त्यांना कळावे व त्या दृष्टीने त्यांनी त्याचे वाचन करावे या हेतूने प्रस्तुतचा कवितासंग्रह तयार करण्यात आला आहे… ‘महाराष्ट्र-रसवंती’चे तीन भाग पाडले असून, त्यांचा माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, त्याचप्रमाणे मराठी प्रशिक्षण शाळा व महाविद्यालये यांत शिकविण्याकडे उपयोग व्हावा असा हेतू आहे. या संग्रहाचे प्राचीन कवींची कविता, चिंतनपर कविता, सुनीत, व्यंगकाव्य, भाषांतरित कविता, ऐतिहासिक कविता, देशभक्ती, स्फूर्तिदायक कविता, सामाजिक कविता, विकारदर्शन, नाविक-गीते, कल्पनाविलास, संकीर्ण, मराठी भाषा आणि आपला महाराष्ट्र असे पंधरा गट केले आहेत. यथावकाश यांतील कवितांचा परामर्श घ्यायचा आहे. परिचित कवितांपेक्षा अनवट कवितांचा अधिक प्रमाणात.

त्याचाच एक भाग म्हणून जुन्या पिढीतील ‘साधुदास’ या कवीची कल्पनाविलास या गटातील ‘तें पाऊल कोणाचें?’ ही कविता आवर्जून निवडली आहे. एकतर लहान मुलांच्या भावविश्‍वात कल्पनाशक्तीला फार मोठे स्थान असते. त्यांच्या सृजनात्मकतेला वाव देण्यासाठी ती पोषक ठरत असते. शिवाय मूळ कल्पना नव्याने सुचणे हे निर्मितिक्षम प्रतिभेचे सर्वात महत्त्वाचे कार्य करीत असते. सामान्य माणसाची कल्पनाशक्ती आणि कवीची कल्पनाशक्ती यात मूलतः फरक नसतो. प्रतिभावंत कवीच्या कल्पनाशक्तीला समृद्ध अनुभवाची मिती लाभलेली असते. त्याचे भावविश्‍वही अनोखे असते. सृष्टीतील वस्तुजाताला त्याच्या प्रतिभेचा परीसस्पर्श होताच त्याला निराळी कळा प्राप्त होत असते. हे निराळेपण चार-चौघांत उठून दिसते. म्हणून आपण त्याचा रसिक या नात्याने गौरव करीत असतो. तिथे जुना कवी, नवा कवी असा भेद नसतो. महत्त्व असते ते रसवत्तेला अन् गुणवत्तेला. ज्ञानदेव, तुकारामांच्या प्रतिभाशक्तीला आपण कालबाह्य म्हणून बाजूला टाकले आहे काय?
साधुदास हे जुन्या पिढीतील, जुन्या वळणाचे कवी. क्रांतदर्शी केशवसुतांची कविता उदयास आल्यानंतरही त्यांनी आपले वळण सोडले नाही. त्यांचा जन्म १७ फेब्रुवारी १८८४ रोजी आणि मृत्यू ६ एप्रिल १९४८ रोजी. त्यांचे मूळ नाव गोपाळ धोंडो पाटणकर. त्यांचे वडील ब्रिटिश राज्यात सर्व्हेअर होते. व्यवसायावरून त्यांचे आडनाव मुजुमदार झाले. १९०४ साली ते चुलत चुलत्यांना दत्तक गेले आणि त्यांचे नाव गोपाळ गोविंद मुजुमदार असे झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जुन्या सांगलीतील मराठी शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे संस्कृतचे शिक्षक श्रीपादशास्त्री देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कालिदास, माघ इत्यादींचे काव्यग्रंथ अभ्यासले. संस्कृतप्रमाणेच इंग्रजी, मराठी या विषयांकडे त्यांचा विशेष ओढा होता. गणितात त्यांना विशेष रूची नव्हती. परंतु आपला पहिला क्रमांक त्यांनी कधी चुकविला नाही. आपल्या कवित्वशक्तीचा शोध त्यांना शालेय वयातच लागला होता.

शीघ्रकवित्व हा त्यांचा विशेष गुण होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पण टर्म संपवून पुण्यातून सांगलीला आले. त्यांच्या पुढील शिक्षणाला विराम मिळाला, याचे कारण म्हणजे त्यांचे बुद्धिबळाचे वेड. तरीही लेखन, वाचन आणि अध्यापन यांत ते रमले. इतिहास, धार्मिक वाङ्‌मय आणि काव्य यांचा व्यासंग त्यांनी वाढविला. छंदःशास्त्रावर त्यांनी प्रभुत्व मिळविले. इतिहासाचार्य राजवाडे यांनीदेखील त्यांची त्याबद्दल प्रशंसा केली. रामायणाच्या कथाभागावर त्यांनी ‘वन’, ‘रण’ आणि ‘गृह’ असे तीन विहार लिहिले. त्यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. कवी, कादंबरीकार, नाटककार, चरित्रकार आणि उत्तम शिक्षक म्हणून ते गणले गेले. बुद्धिबळपटू आणि तबलावादक म्हणूनही त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. त्यांचा कल पूर्वीपासून धार्मिकतेकडे आणि अध्यात्माकडे होता. साधुमहाराज नावाच्या सत्पुरुषाचे शिष्यत्व, म्हणून त्यांनी ‘साधुदास’ हे नाव धारण केले. जुन्यात नवीन आणि नव्यात जुने म्हणून काव्यक्षेत्रात ते अलक्षित राहिले. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राजकवी यशवंतांवर होता.

‘तें पाऊल कोणाचें’ या साधुदासांच्या कवितेत कमालीचे रचनासौष्ठव आढळते. ही जुन्या कालखंडातील रचना आहे हे सांगूनही खरे वाटणार नाही. ती संवेदनानिष्ठ आहे. तिच्यातील चित्रमयता लक्ष वेधून घेते. दृक् संवेदनेबरोबरच रंग-नाद या संवेदना निर्माण करणारी कविमनातील स्पंदने येथे नेमक्या आणि नीटस शब्दकळेतून व्यक्त झाली आहेत. जाणिवेच्या क्षेत्राबरोबर नेणिवेचा शोध घेणार्‍या प्रतिभाशक्तीचे येथे विलोभनीय दर्शन घडते ः
गगनीं एके क्षणीं| दुज्या तें उठतें क्षितिजांतुनी॥
पाउल दिसतें परी तयाचा कोण असावा धनी?॥
अज्ञात विश्‍वाविषयी वाटणारे कुतूहल येथे उत्कटतेने व्यक्त होते. निसर्गानुभूतीची ओढ कविमनाला लागून राहिलेली आहे. म्हणूनच त्याने नितांत रमणीय क्षणचित्रांची मालिका चित्रकाराच्या कुंचल्याच्या कौशल्याने गुंफलेली आहे. शिवाय तिला अन्य कोणकोणत्या गुणविशेषांची मिती मिळालेली आहे? यात स्मरणोज्जीवित अनुभूती आहेत… त्यांची निवड करताना कविमनाची सौंदर्यसृष्टी व्यक्त होते… चिंतनशीलता दिसते. या परस्परपोषक घटकांचे एकदम स्वरूप प्रत्ययास येते. सृष्टितत्त्वातील नवा विचार मांडणारे अंतःस्फुरण येथे आहे. सृष्टिनिरीक्षणानंतर शास्त्रीय सत्य शोधण्याची जी प्रेरणा असते, ती येथे प्रकट झालेली नसून भावयत्री प्रतिभेतून निर्माण झालेले हे कल्पनाचित्र आहे. म्हणूनच ‘गगनाच्या अंगणात उमटलेले शुभलाक्षणी पाऊल’, ‘संध्यारागातून तयाचा दिसणारा तळ’, ‘स्वर्गंगेसम दिसणार्‍या रेषा’, पाऊल पडताक्षणी ‘पैंजणाची जाहलेली तुटातूट’, ‘अस्ताव्यस्त विखुरलेले नक्षत्रांचे मणी’ व ‘अव्यक्ताच्या अवकाशातून कानी येणारा तो रुणझुण ध्वनी, या प्रतिमामालिकेतून ते समूर्त झालेले आहे.

हे झाले कविमनाने तन्मयतेने रंगविलेले चित्र; आणि रसिकमनावर उमटलेले त्याचे रंगतरंग कोणते? ः
कोणीतरी नभांगणात पावले उमटवीत चालले आहे… मऊ जमिनीवर तळपायाच्या रेषा उमटल्या आहेत… पायांतल्या पैंजणाचे मणी विखुरले आहेत… पाहणार्‍याची दृष्टी आकाशरूपी पृष्ठभागावर व चालणारी व्यक्ती त्यापलीकडे वर अदृश्य असल्यामुळे ठिकठिकाणी पावले उमटताना दिसत आहेत; कोणाचे बरे हे पाऊल, असे कुतूहल वाटू लागते… कवीला पारदर्शक निळ्या अंगणात, आकाशात, आकाशगंगेत तारे, संध्याकालीन प्रसन्न रंग दिसतात… स्वर्गीय संगीत ऐकू येते… सूर्य-चंद्राची बिंबे आणि इंद्रधनुष्याच्या कमनीय कमानी दिसू लागतात… या विस्मयकारक निसर्गानुभूतीने कवीचा जीव मंत्रभारल्यागत होतो आणि तो उद्गारतो ः ‘‘हे पाऊल कुणाचे?’’
निसर्गाची अशी अनेक कोडी कविमनाला प्रश्‍नांकित करतात. या प्रश्‍नोपनिषदांतून कवितेचा जन्म होतो.