दहावी इयत्तेत शिकत असताना आपणाला मारहाण करणार्या एका शिक्षिकेवर सूड उगवण्यासाठी एका २५ वर्षीय युवकाने सदर शिक्षिकेच्या पतीला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल पहाटे ३.३० च्या सुमारास काकुमड्डी-केपे येथे घडली. या प्रकरणी केपे पोलिसांनी अभिषेक नायक या युवकाला अटक केली आहे.
सविस्तर माहितीनुसार, अभिषेक नायक याने काल पहाटे सदर शिक्षिकेच्या घराच्या छपराची कौले काढून घरात प्रवेश केला. त्यानंतर तिचे पती लक्ष्मीकांत शिकेरकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला; पण अंगावर पेट्रोल पडल्याने शिकेरकर यांना जाग आली. त्यामुळे संशयिताचा प्रयत्न फसला.
केपे पोलिसांनी संशयिताला अटक केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आपण दहावी इयत्तेत शिकत असताना सदर शिक्षिका आपणाला मारहाण करत होती. त्यामुळे त्याचा सूड घेण्यासाठी तिच्या पतीला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचे संशयिताने पोलिसांना सांगितले.