स्वतःच्याच 4 वर्षांच्या मुलाच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या सूचना सेठ हिची मानसिक स्थिती डॉक्टराच्या पथकाकडून तपासण्याचा आदेश येथील बाल न्यायालयाने काल दिला.
कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये स्वतःच्या 4 वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा आरोप सूचना सेठ हिच्यावर आहे. सूचना हिची मानसिक स्थिती पुन्हा तपासावी, ही तिच्या वडिलांची याचिका पणजी बाल न्यायालयाने मान्य केली आहे. सूचना सेठ हिने 6 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीसाठी उत्तर गोव्यातील कांदोळी येथील एका हॉटेलची खोली बुक केली होती. तथापि, 7 जानेवारीच्या रात्री तिने बंगळुरूमध्ये तातडीचे काम असल्याचे सांगून ती हॉटेलमधून बाहेर पडली होती. यानंतर सूचना राहिलेल्या खोलीत रक्ताचे डाग आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून सूचना प्रवास करीत असलेली कार कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात अडवून तपासणी केली असता त्यात एका बॅगेत मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली होती.
कळंगुट पोलिसांनी सूचना सेठ हिची बांबोळी येथील आयपीएचबी या सरकारी इस्पितळातून मानसिक स्थितीची तपासणी केल्यानंतर तिची मानसिक स्थिती ठीक असल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला होता. असे असले तरी, आपल्या मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा तिच्या वडिलांनी करत पुन्हा मानसिक स्थितीची तपासणी करण्याची मागणी केली होती.