सरकारची उच्च न्यायालयात माहिती; तूर्त आव्हान याचिका निकालात
राज्याच्या शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याच्या मसुद्यावर आक्षेप आणि सूचना स्वीकारण्याची मुदत 27 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. शिक्षण खाते या मसुद्यावर येणाऱ्या आक्षेपांवर विचार करून नंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत अधिसूचना जारी करणार आहे, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी मुंबई उच्च न्यायालयात काल दिली.
शिक्षण खात्याकडून 28 मार्च किंवा नंतर नवीन शैक्षणिक वर्षाबाबत अधिसूचना जारी केली जाणार आहे. राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी ह्या केलेल्या निवेदनाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या शिक्षण खात्याच्या आदेशाला आव्हान देणारी काही पालकांची याचिका काल निकालात काढली.
येत्या एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या मसुद्यावर 400 आक्षेप प्राप्त झाले असून, त्यावर विचारविनिमय केला जात आहे, अशी माहिती सरकारने उच्च न्यायालयाला दिली.
राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन मसुद्यानुसार येत्या एप्रिलपासून सहावी ते दहावी आणि बारावीचे वर्ग घेतले जाणार आहेत, तर पहिली ते पाचवी आणि अकरावीचे वर्ग जूनपासून घेतले जाणार आहेत.