सुसंवाद व शांतीसाठी योगसाधना

0
168
  • डॉ. सीताकांत घाणेकर

लाखो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. लाखो रोगी मृत्युमुखी पडत आहेत… आणि त्याला एक उत्तम उपाय म्हणजे प्रत्येकाने स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणे. यासाठी योगसाधना अत्यंत उपयोगी आहे.

२१ जून… आंतरराष्ट्रीय योगदिन. दरवर्षी नियमित येतो… कारण काळ कुणासाठी थांबत नाही. दिवसामागून दिवस जातात, वर्षामागून वर्षे जातात, विविध महत्त्वाचे दिवस येतात… त्यांतीलच हा एक दिवस! विश्‍वातील शेकडो राष्ट्रे व लाखो व्यक्ती हा दिवस आनंदाने व उत्साहाने ‘योगदिन’ म्हणून साजरा करतात. शाळा, कॉलेज, विश्‍वविद्यालय, विविध संस्था या उत्सवात सहभागी होतात. सरकारदेखील अनेक कार्यक्रम ठेवते. कुठल्या तरी हॉलमध्ये अथवा मैदानावर. यंदादेखील सर्वांची जय्यत तयारी चालू आहे.
पण या वर्षी एक फार मोठा फरक आहे. विश्‍वातील प्रत्येक देशात ‘कोरोना’चे राज्य सुरू आहे. काही ठरावीक बंधने आहेत. जास्त व्यक्तींना एकत्र भेटता येत नाही. काही हरकत नाही… दिवस साजरा करायलाच हवा; मग तो ऑनलाईनदेखील चालेल! त्याचे कारण म्हणजे, लाखो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. लाखो रोगी मृत्युमुखी पडत आहेत… आणि त्याला एक उत्तम उपाय म्हणजे प्रत्येकाने स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणे. यासाठी योगसाधना अत्यंत उपयोगी आहे. मात्र ती शास्त्रशुद्ध हवी.

प्रथम आपण एकत्रित विश्‍व संघटनेचे ब्रीदवाक्य बघू-
‘योग फॉर हारमनी ऍण्ड पीस’ (सुसंवाद व शांतीसाठी योग)
हे ध्येय अति उत्तम आहे, तो संकल्प उच्च आहे; पण सिद्धीपर्यंत पोचण्यासाठी योगसाधना शास्त्रशुद्ध हवी. पण आज तशी होतेय का? विचार केला तर उत्तर नकारात्मक येईल. त्याची कारणं पुष्कळ आहेत.
१. बहुतेकांना ब्रीदवाक्यच माहीत नाही.
२. एकच दिवस हा समारंभ केला जातो. साधना नियमित, अखंड हवी.
३. जास्त करून योग शारीरिक पैलू समोर ठेवून केला जातो, कारण इतर पैलू अनेकांना माहीत नाहीत.
काही हरकत नाही. आपण नकारात्मक विचार न करता एवढे तरी कौतुक करूया की योगदिन सगळीकडे पाळला जातो. प्रत्येक भारतीयाला ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पाच हजार वर्षांपूर्वीचे योगशास्त्र आज सर्व विश्‍वात शिकवले जात आहे.
आपण शास्त्रशुद्ध योग म्हणजे काय ते बघू. अशा शास्त्राचे विविध पैलू बघायला हवेत. त्याचा अभ्यास करायला हवा. ते म्हणजे-
योग शब्दाचा अर्थ उत्पत्ती
योगाच्या व्याख्या, योगाबद्दल गैरसमज.
योगमार्ग आणि त्याची विविध अंगे.
मानवाचे कोश.
योगाबद्दल भारतीय साहित्य.
योगसाधना करण्याचा हेतू.
योगातील प्रार्थना.
योगाचे फायदे.
योगसत्र.
योगोपचार.
एकत्रित राष्ट्राच्या ब्रीदवाक्याची ध्येयपूर्ती.
‘योग’ शब्दाचा अर्थ आणि उत्पत्ती
खरे म्हणजे हा संस्कृत शब्द आहे. योगः – आम्ही ‘योग’ म्हणतो. योग म्हणजे ‘मीलन’, ‘भेटणे’, ‘जोडणे.’ आपली प्रार्थना आहे- ‘सदासर्वदा योग तुजा घडावा…’ बोलताना अनेकवेळा आपण म्हणतो- ‘आज भेटण्याचा योग आला.’ इंग्रजीतदेखील शब्द आहे- ‘योक’- जो बैलांच्या मानेवर घातला जातो. नांगरताना अथवा बैलगाडीवर अशा जुडण्यामुळे कर्तव्यशक्ती वाढते.
१) योग म्हणजे जोडणे- मन व शरीर- आत्मा व परमात्मा.
२) योग म्हणजे चित्तावर नियंत्रण ठेेवणे.
३) योग म्हणजे मनाचे प्रशमन करणे.
४) योग म्हणजे मनबुद्धी (यशापयशात राखणे).
५) योग म्हणजे सर्व करण्यामध्ये कुशलता.
योगाबद्दल गैरसमज अनेक आहेत. त्याचे कारण म्हणजे योगशास्त्राबद्दल अज्ञान अथवा विपरित ज्ञान.
– योग म्हणजे सिद्धी मिळवण्यासाठी करण्याची साधना.
– योग फक्त साधुसंन्याशांनीच करायचा; इतरांनी नाही.
– मी नियमित व्यायाम करतो, फिरायला जातो. मला योगाची गरज नाही.
– वजन कमी करण्याचा उपाय म्हणजे योग.
– ज्यांचे वजन कमी असते, त्यंानी योग केला तर आणखी कमी होते म्हणून त्यांनी योग करू नये.
– योगसाधना करणार्‍याला अनेक बंधने पाळावी लागतात.
– योग पुष्कळ कठीण.
– योग अगदी सोपा, पुस्तकातूनही शिकू शकतो.
– रक्तदाब, हृदयविकार असलेल्यांनी योग करू नये.
– योग म्हणजे श्‍वासाचे व्यायाम.
– योग फक्त हिंदूंसाठीच, इतर धर्मीयांनी करू नये.
– योगाचे फायदे लगेच दिसत नाहीत.

योगमार्ग ः हे प्रमुख चार आहेत.
१. ज्ञानयोग ः आत्मविश्‍लेषणाचा मार्ग. बुद्धी प्रमुख. त्यात जीवनाची वास्तविकता, सुख-दुःखे, त्यांचे ज्ञान.
२. कर्मयोग ः स्वार्थत्यागाचा मार्ग. कर्मावर ध्यान प्रमुख. यामुळे कर्मकुशलता वाढते.
३. भक्तियोग ः आत्मचिंतनाचा मार्ग. प्रेम प्रमुख. मनाला स्थिरता लाभणे.
४. राजयोग ः पतंजली योग. अष्टांग योग. आत्मनियंत्रणाचा मार्ग. इच्छाशक्ती प्रबळ होते. येथे निर्णयशक्ती सुदृढ होते.
आठ अंगे
१. यम ः व्यक्ती व समाजासाठी सद्वर्तनाचे आदेश. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह.
२. नियम ः स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी आत्मशासनाचे आदेश. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्‍वर प्रणिधान.
३. आसन व्याख्या ः स्थिर सुखआसनम्. आसन म्हणजे फक्त शारीरिक व्यायाम नव्हे. त्यात शरीर व मन स्थिर असून सुखाचा अनुभव घ्यायचा असतो.
४. प्राणायाम ः प्राणशक्तीवर नियंत्रण.
५. प्रत्याहार ः उपभोगाच्या विषयापासून इंद्रियांवर नियंत्रण.
६. धारणा ः चित्ताची स्थिरता. बाह्यधारणा व अंतर्धारणा.
७. ध्यान ः चित्त एकाग्रता.
८. समाधी ः चित्ताची एककारता.
यातील पहिली पाच अंगे
१. बहिरंग योग ः शरीर व इंद्रियांच्या माध्यमाने मनाचे संवर्धन.
२. अंतरंग योग ः मनाचा वापर करून मनाचे संवर्धन.
मनाचे कोश ः पंचकोश
मानव म्हणजे फक्त शरीर नाही तर त्याचे पाच कोश आहेत.
१. अन्नमय (शरीर), २. प्राणमय (प्राण), ३. मनोमय (मन), ४. विज्ञानमय (बुद्धी), ५. आनंदमय (आत्मा)
मनाचे पाच जीवनपैलू आहेत-
१) शारीरिक, २) मानसिक, ३) भावनिक, ४) बौद्धिक, ५) आध्यात्मिक.

योगशास्त्र फार मोठे गहन शास्त्र आहे. योगशास्त्रज्ञ सांगतात की हे ज्ञान सुरुवातीला श्रीशंकरानी पार्वतीला सांगितले. तिने सप्तर्षींना सांगितले. महर्षी पतंजलीनी पाच हजार वर्षांपूर्वी पतंजली सूत्रे लिहिली. तसेच श्रीकृष्णानी श्रीमद् भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. गीता तर योगाचे पूर्ण शास्त्रच आहे आणि श्रीकृष्ण योगेश्‍वर आहेत. ही दोन्ही ज्ञानपूर्ण आहेत, त्याबरोबर हठयोग प्रदीपिका आहे.
योगसाधना करण्याचा हेतू ः प्रत्येक हेतू वेगळा असतो. काहीजण आरोग्य चांगले राहावे म्हणून योग करतात. पण योगाचा प्रमुख हेतू आहे जीवनविकास. योगशास्त्रामध्ये अनेक प्रार्थना आहेत.

योगाचे फायदे
– चित्त एकाग्रता ः संपूर्ण कर्तृत्वशक्तीत वाढ.
– भावनांवर नियंत्रण व विजय ः प्रबळ इच्छाशक्ती.
– नियंत्रित इच्छा ः अहंकारावर विजय व योग्य दिशा.
– आत्मविश्‍वासात वृद्धी ः उत्पादनशक्तीत वाढ, शांत झोप.
– स्मरणशक्तीत वाढ ः आंतरिक बळात बाढ.
– मनःशांती ः चिंतेत घट व चिंतनात वृद्धी.
– रोग प्रतिकारशक्तीत वाढ ः सृजनशीलतेत वृद्धी.
– अंतर्ज्ञानप्राप्ती.
हे सर्व फायदे अनुभवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करावे.
– प्रशिक्षित गुरूचे मार्गदर्शन.
– शास्त्रशुद्ध नियमित योगसाधना.
– योगशास्त्राच्या सर्व मार्गांचा व अंगांचा अभ्यास.
– योगसाहित्याचा अभ्यास.
योगसत्र ः यामध्ये योगतत्त्वज्ञान व तंत्रे आवश्यक. अत्यंत लाभदायक वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. प्रातःकाळी ३.३० ते ५.३० वाजता.
योगोपचार ः हल्ली सर्व तर्‍हेचे रोग वाढताहेत. चुकीच्या जीवनपद्धतीमुळे व ताणतणावांमुळे. वैद्यकीय उपचारांबरोबर योगोपचार केल्यास अनेक रोगांवर नियंत्रण मिळते. काही रोग संपूर्ण बरे होतात.

दरवर्षी योगदिन साजरा केला जातो. पण या वर्षी कोरोनाच्या आक्रमणामुळे विविध समस्या आहेत. रोग्यांची व मृतांची वाढती संख्या. मानवता विश्‍वभर भयभीत झालेली आहे. संशोधन व उपाय चालू आहेत, पण अपेक्षित यश मिळत नाही. यावर शास्त्रशुद्ध योगसाधना अत्यंत उपयुक्त ठरेल. म्हणून तसा अभ्यास अत्यावश्यक आहे.