सुशील कुमार मोदी यांचे दिल्लीत निधन

0
18

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी (72) यांचे सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील एम्स इस्पितळात निधन झाले. ते घशाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. घशात दुखत असल्याच्या तक्रारीवरून 3 महिन्यांपूर्वी त्यांची चाचणी झाली, तेव्हा त्यांना कर्करोग झाल्याचे आढळून आले. यानंतर त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू होते.
स्वतः सुशील मोदी यांनी 3 एप्रिल रोजी सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली होती. त्यात त्यांनी गेल्या 6 महिन्यांपासून मी कर्करोगाशी झुंज देत असल्याचे म्हटले होते.

सुशील मोदी 70 च्या दशकातील जेपी आंदोलनातून बिहारच्या राजकारणात आले. त्यानंतर आरएसएसशी जोडले गेले. 1971 मध्ये त्यांचे विद्यार्थी राजकारण सुरू झाले. 1990 मध्ये सुशील यांनी पाटणा मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 2004 मध्ये त्यांनी भागलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. 2005 मध्ये त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि विधान परिषदेवर निवडून आले आणि उपमुख्यमंत्री झाले. सुशील मोदी 2005 ते 2013 आणि 2017 ते 2020 पर्यंत बिहारचे अर्थमंत्री राहिले.