सुशासन बाबूंचा पेच

0
113

लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडीदेवी, कन्या मिसा भारती आणि चिरंजीव तेजस्वी यादव यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणांत सीबीआयने छापे मारले, तरीही यादव कुटुंबियांची हडेलहप्पी काही कमी झालेली दिसत नाही. सीबीआयचे छापे पडले तरी बिहारचे उपमुख्यमंत्रिपद सोडायची तेजस्वी यादव यांची आजही तयारी नाही आणि लालूप्रसाद यांनी त्याचे उघडउघड समर्थन चालवले आहे. या पार्श्वभूमीवर आता निर्णय मुख्यमंत्री नितीशकुमार यांना घ्यायचा आहे. नितीश यांची प्रतिमा आजवर एका स्वच्छ मुख्यमंत्र्याची राहिली आहे. राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेसच्या साथीने जरी त्यांनी बिहारचे सरकार चालवलेले असले, तरी भ्रष्टाचाराचा डाग स्वतःवर येऊ दिलेला नाही. मात्र, लालूप्रसाद आणि मंडळींच्या काळ्या कारवायांचे ओझे आपण का वाहायचे याचा विचार नितीश यांच्या मनात रुंजी घालत असावा. त्यांनी चार दिवसांच्या आत तेजस्वीने आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी अपेक्षा नुकतीच जाहीरपणे व्यक्त केली. यादव परिवाराच्या हे पचनी पडलेले दिसत नाही. पडलो तरी नाक वर या न्यायाने यादव कुटुंबीय राजकीय सूडाचे अकांडतांडव करीत आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप झिडकारून टाकू पाहात आहेत. पण नितीश यांच्या स्वच्छ प्रतिमेचे काय. आजवर ‘सुशासन बाबू’ म्हणून त्यांचे देशभरात कोडकौतुक झाले. उपमुख्यमंत्री तेजस्वी यांच्यावरील गंभीर आरोपांनंतरही जर ते त्याची पाठराखण करतील तर या प्रतिमेला निश्‍चितपणे तडा जाईल. नितीश यांना हे पुरेपूर ठाऊक आहे. त्यामुळे हळूहळू भारतीय जनता पक्षाच्या दिशेने त्यांचे तारू वळू लागलेले दिसते. बिहार सरकारचा पाठिंबा राजदने काढून घेतला तर भाजपा नितीश सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची भाषा बोलू लागला आहे तो याच जवळिकीचा संकेत आहे. वास्तविक नितीश आणि भाजपा यांच्यात काडीमोड झाला, तेव्हा नरेंद्र मोदी हेच त्याचे कारण ठरले होते. परंतु नंतरच्या काळात पुन्हा नरेंद्र – नीतीश जवळ आले. शिखांच्या ‘प्रकाशपर्व’ सोहळ्यातही दोघे एकत्र आले होते. त्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सातत्याने नितीश यांच्याविषयी चांगले बोल वर्तवले आहेत. ही सगळी नितीश यांना जाळ्यात पकडण्याची खेळी दिसते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून जेव्हा बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव मोदींनी पुढे केले, तेव्हा नीतिशकुमार यांनी त्या नावाला पाठिंबा दर्शवून टाकला. त्यामुळे बिहारमध्ये लालूप्रसाद आणि कुटुंबाला एकटे पाडताना दुसरीकडे नीतिशकुमार यांना जवळ करण्याची नीती भाजपाने अवलंबिलेली दिसते. तेजस्वी यांच्याविरुद्धचे आरोप गंभीर आहेत हे निःसंशय. लालूप्रसाद रेल्वेमंत्री असताना रेल्वेच्या हॉटेलांच्या कंत्राटांच्या बदल्यात त्यांना स्वस्तात जमीन दिली गेली, जिची किंमत आज ९० कोटींच्या घरात पोहोचली आहे. या जमिनीवर बिहारमधला सर्वांत मोठा मॉल उभारण्यात येत होता. सीबीआयच्या कारवाईमुळे लालू आणि कुटुंबाच्या या सगळ्या बारा मालमत्तांवर जप्ती आली. अशावेळी लालूंचे समर्थन करण्याऐवजी त्यांच्यापासून अंतर ठेवण्यातच आपले हित आहे हे नीतिशकुमार जाणून आहेत. त्यामुळे या बदलत्या राजकीय समिकरणांचा फायदा भाजपा उठविल्यावाचून राहणार नाही. नीतिशकुमार यांच्या भाजपाशी वाढू लागलेल्या या जवळिकीचा परिणाम अर्थातच विरोधी आघाडीवर होणार आहे. अठरा पक्षांचे कडबोळे उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी दंड थोपटून उभे ठाकले आहे. अशा वेळी नीतिशकुमार यांनी वेगळी वाट स्वीकारणे विरोधकांना मारक ठरू शकेल. पण शेवटी तेजस्वी प्रकरणात नीतिश बघ्याची भूमिकाही घेऊन बसू शकणार नाहीत. तेजस्वी यांनी या परिस्थितीत राजीनामा देणेच शहाणपणाचे ठरेल.