सुवर्णमय टप्प्यातील गोमंतकीय ग्रंथालय चळवळ

0
11
  • डॉ. सुशांत दत्ताराम तांडेल
    (क्युरेटर, गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय)

भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त (12 ऑगस्ट) ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ साजरा करण्यात येतो. वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृद्धिंगत व्हावी, देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली व्हावीत या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त सुवर्णमय टप्प्यातील गोमंतकीय ग्रंथालय चळवळीविषयी आज आपण जाणून घेऊ…

पोर्तुगीज कालखंड- तत्पूर्वी व तद्नंतर आजपर्यंतच्या गोमंतकीय ग्रंथालय चळवळीच्या वाटचालीचा विचारपूर्वक अभ्यास करून, राज्यात आगामी कालावधीत येऊ घातलेली 78 नवीन सुसज्ज ग्रामीण ग्रंथालये, 77 विद्यमान ग्रामीण ग्रंथालयांचे अद्ययावत नूतनीकरण, संपूर्ण देशात प्रथमच होणार असलेले ‘गोवा राज्य ग्रंथालय धोरण’, सध्या चालू असलेले दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन, वाचन व वाचककेंद्रित सातत्यपूर्वक कार्यक्रम-उपक्रम, राज्याच्या कानाकोपऱ्यांत जाऊन करण्यात येत असलेली पुस्तक वाचनासंदर्भातील जनजागृती इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास वर्तमान कालावधीत गोमंतकीय ग्रंथालय चळवळ विकासाच्या बाबतीत सुवर्णमय टप्प्यातून जात आहे यात शंका नाही.

पुस्तकप्रेमी, पट्टीचे वाचक, ग्रंथालयांच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेणारे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री मा. श्री. गोविंद गावडे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली चाललेली गोमंतकीय ग्रंथालय क्षेत्राची विद्यमान घोडदौड लक्षात येण्यासाठी या विषयाचा विस्तृत मागोवा घेणे क्रमप्राप्त आहे.

पोर्तुगीजपूर्व कालखंड
आपल्या या गोमंतकाचा इतिहास, परंपरा आणि मूळ संस्कृती लक्षात घेतल्यास जाणवते की उर्वरित संपूर्ण भारत देशाप्रमाणेच आपल्याही या गोमंतकात पुरातन काळापासून ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असा पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आहे. या आपल्या गोमंतकात पोर्तुगीजांपूर्वी अनेकांनी राज्य केले; ज्यांत भोज, मौर्य, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, कदंब, बहामनी, विजयनगर, आदिलशाही इत्यादी राजे आणि राजघराण्यांचा समावेश आहे. या सर्वांच्या कालखंडात या ठिकाणी वाचनालयाची संकल्पना जरी अस्तित्वात नसली तरी माहितीचा व ज्ञानाचा मौखिक प्रचार व प्रसार वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, पुराण इत्यादी हस्तलिखित धर्मग्रंथांच्या साहाय्याने प्रामुख्याने मंदिर परिसरातून चालूच होता. मंदिरांच्या अग्रशाळा या तर अशा मौखिक ज्ञानाच्या प्रचार व प्रसाराच्या केंद्रबिंदूच होत्या.

पोर्तुगीज कालखंड
त्यांच्यानंतर 1510 साली या निसर्गसंपन्न भूभागावर व्यापाराच्या इराद्याने एका हातात तलवार व दुसऱ्या हातात धर्मग्रंथ घेऊन पाय ठेवलेल्या व अल्पावधीतच ते पाय अगदी जोमाने रोवून स्थानिकांवर अगणित अत्याचार केलेल्या पोर्तुगीजांनी अगदी विरळच का होईना, पण काही गोष्टी अशा आरंभल्या, ज्या आजतागायत चालू आहेत. यात प्रामुख्याने गणना केली जाऊ शकते ती ग्रंथालयांची.

1832 साली तत्कालीन पोर्तुगीज व्हाइसरॉय डोम मान्युअल-द-पोर्तुगाल ई-कास्ट्रो यांनी प्रारंभ केलेल्या ‘पब्लिका लिवरारिया’ या आशिया खंडातील जुन्या अशा ग्रंथालयाच्या मागे स्थानिकांचे हित जपण्याचा किंवा त्यांना ज्ञानसंपन्न करण्याचा हेतू मुळात यत्‌‍किंचितही नव्हता. त्यांचा मूळ एकमेव उद्देश होता तो म्हणजे, त्यांचे पाखंडी राज्य या गोमंतभूमीवर दीर्घकाळ चालविण्यासाठी व स्थानिकांच्या मुक्ततेसाठीचा प्रयत्न ठेचून काढण्यासाठी लागणाऱ्या सैन्याची निर्मिती करण्यासाठी लागणारे वाचनसाहित्य व त्यांचेच धर्मसंबंधी ग्रंथ जोपासण्यासाठी, त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ग्रंथालय.

असे हे स्वार्थापोटी आरंभलेले ‘पब्लिका लिवरारिया’ नावाचे ग्रंथालय 1870 साली नामकरण करून ‘बिब्लिओथेका पब्लिका-दे-नोवा गोवा’ करण्यात आले. तद्नंतर 1925 साली याच पोर्तुगीजांनी आपल्या राष्ट्रीय ग्रंथालयाचा दर्जा देऊन त्याचे पुन्हा एकदा ‘बिब्लिओथेका नॅशनल वास्को-दा-गामा’ असे नामकरण केले.
एकूणच पोर्तुगीज राजवटीच्या कालखंडात गोमंतकात कार्यरत महत्त्वाच्या सरकारी व खाजगी ग्रंथालयांची यादी याप्रमाणे-
क्र. नाव प्रारंभ स्थान

  1. पब्लिका लिवरारिया 1832 पणजी
  2. बिब्लिओथेका म्युनिसिपल आतायडे 1883 म्हापसा
  3. सारस्वत पुस्तकालय 1889 मार्शेल
  4. गोवा हिंदू पुस्तकालय 1899 पणजी
  5. शांतादुर्गा वाचनालय 1902 सावर्डे
  6. श्री महालक्ष्मी वाचनमंदिर 1907 पणजी
  7. सारस्वत विद्यालय ग्रंथालय 1907 म्हापसा
  8. दुर्गा वाचनमंदिर 1908 म्हापसा
  9. पारोडा मराठी संग्रहालय 1908 पारोडा
  10. गोमंतक विद्यानिकेतन ग्रंथालय 1912 मडगाव
  11. श्री रवळनाथ वाचनालय 1912 पेडणे
  12. सरस्वती मंदिर वाचनालय 1913 पणजी

यांव्यतिरिक्त 1901 ते 1910 दरम्यान दक्षिण गोव्यात शिरोडा, वाडे, तळावली, सावर्डे इत्यादी ठिकाणी, तर उत्तर गोव्यात पणजी, नेरूल, म्हापसा, चिकली, पेडणे, करमळी, साखळी, डिचोली, कुंभारजुवे इत्यादी ठिकाणी स्थानिक देवदेवतांच्या नावे गोमंतकीयांनी विविध वाचनालये प्रारंभ केली.
त्याचबरोबर 1914 नंतर मडगाव, साखळी, फोंडा, सांगे, मुरगाव, पेडणे, वाळपई, पणजी व काणकोणमध्ये पोर्तुगीज सरकारने म्युनिसिपल (नगरपालिका) वाचनालये सुरू केली. ही सर्व नगरपालिका वाचनालये सरकारी (पोर्तुगीज) खर्चाने चालत होती. स्वाभाविकपणे त्याठिकाणी त्यांच्याच धर्माची व त्यांच्याच जुलमी राजवटीला सोयीस्कर पुस्तके असणे स्वाभाविक होते.

याउलट स्थानिक गोमंतकीय दानशूर व प्रदेशप्रेमी व्यक्तींच्या दानाच्या साहाय्याने चालविलेल्या व धर्म, संस्कार आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या, ज्ञानाचा खजिना तत्कालीन समस्त गोमंतकीयांना दिला आणि खऱ्या अर्थाने 450 वर्षांच्या जुलमी, पाखंडी राजवटीत गोमंतकीयांचे गोमंतकीयत्व आणि भारतीयत्व शाबूत ठेवले ते म्हणजे स्थानिकांनी स्थानिकांसाठी चालविलेल्या वाचनालयांनी. खरे म्हणजे त्यांना देव, धर्म आणि देशप्रेमासंबंधी पुस्तके ठेवण्यास तशी मोकळीक नव्हतीच; पण तरीही या सर्व खाजगी ग्रंथालयांची सदर पुस्तके, वर्तमानपत्रे, नियतकालिके आपापल्या ठिकाणी स्थानिक जनतेच्या वाचनासाठी ठेवली आणि म्हणूनच गोमंतकीयांच्या मनात गोवामुक्तीची आग धगधगत राहिली. यापैकी म्हापसा येथील दुर्गा वाचन मंदिरात भारत देशाचे थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील एक पुस्तक सापडले म्हणून पोर्तुगीज गव्हर्नराने ते दुर्गा वाचनालय त्वरित बंद करून टाकले, जे पुन्हा गोवामुक्तीनंतरच सुरू झाले. अशा प्रकारे पोर्तुगीज कालखंडात गोमंतकीयांची वाचनाची खरी भूक भागवली ती स्थानिकांनी, स्थानिकांसाठी चालविलेल्या स्थानिक सार्वजनिक ग्रंथालयांनीच. याउलट इन्क्विझिशनच्या नावाखाली पाखंडी पोर्तुगीजांनी स्थानिक भाषेतील कित्येक लिखित साहित्य अक्षरशः जाळूनच टाकले.

गोवा मुक्तीनंतरचा कालखंड
गोमंतकीय ग्रंथालय चळवळीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली ती गोवा मुक्तीनंतरच्या कालावधीतच. कारण, भारत सरकारच्या सर्व योजनांचा, विकासासाठीच्या अर्थसाहाय्याचा आपल्या गोमंतकालाही लाभ होऊ लागला. सांस्कृतिक, भाषिक व नातेवाईक ऋणानुबंध असलेल्या शेजारील महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषेतील विपुल वाचन-साहित्य आता समस्त गोमंतकीयांना सहज उपलब्ध होऊ लागले.

याच दरम्यान 1963 साली ‘गोमंतक ग्रंथालय संघा’ची गोव्यात स्थापना करण्यात आली. गोमंतकीय ग्रंथालय चळवळीचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तत्कालीन ज्येष्ठ ग्रंथपाल तथा नामवंत पत्रकार बा. द. सातोस्कर यांच्या विशेष प्रयत्नांनी सुरू झालेल्या या ‘गोमंतक ग्रंथालय संघा’चे गोमंतकीय ग्रंथालय चळवळीत फार मोठे योगदान आहे. या संघटनेतर्फे तत्कालीन सर्व सार्वजनिक ग्रंथालयांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तत्कालीन सरकारला देण्यात आला, ज्याची फलश्रुती म्हणून त्यावेळपासून त्या सर्व सार्वजनिक ग्रंथालयांना सरकारतर्फे अनुदान देण्यास प्रारंभ झाला.

याच ‘गोमंतक ग्रंथालय संघटने’तर्फे गोव्यात ग्रंथालय अधिवेशने भरविण्यात आली. ग्रंथालयशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इत्यादी राज्यांतील ग्रंथालय संचालनालयांच्या संचालकांना आमंत्रित करून गोमंतकीय ग्रंथपालांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ प्राप्त करून दिला.
त्यानंतर 2000 साली महाविद्यालयीन ग्रंथपालांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी ‘गोवा लायब्ररी असोसिएशन’ (गोला) नामक संघटना स्थापन केली, तर राज्यात उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कार्यरत ग्रंथपालांनी ‘हायर सेकंडरी स्कूल लायब्ररियन असोसिएशन’ व सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत बिगर सरकारी (एनजीओ) संघटनांच्या ग्रंथालयांमध्ये कार्यरत ग्रंथपालांनी आपल्या प्रगतीसाठी व समस्या निवारण्यासाठी स्वतंत्र संघटना प्रारंभ केली. अशा या सर्व ग्रंथपालांच्या संघटना गोमंतकीय ग्रंथालय चळवळीत आपले अनमोल असे योगदान अजूनही निरंतरपणे देत आहेत.

अशा सर्व पार्श्वभूमीवरून वाटचाल करून आलेली गोमंतकीय ग्रंथालय चळवळ या आपल्या चिमुकल्याशा गोमंतकात खऱ्या अर्थाने आज हरणाचे पायखूर लावून दौडत आहे, अर्थातच घोडदौड करीत आहे. कारण गोमंतकीय ग्रंथालय चळवळ खऱ्या अर्थाने समस्त गोमंतकीय जनतेची चळवळ व्हावी आणि इथली वाचन-संस्कृती वृद्धिंगत होऊन इतर राज्यांनाही ती आदर्श ठरावी म्हणून अगदी समर्पित भावनेने धडपडणारे, तळमळणारे, अत्यंत प्रभावी व कार्यकुशल, स्फूर्तिदायक नेतृत्व करणारे मंत्री श्री. गोविंद गावडे हे या खात्याची धुरा अगदी समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या अथक व अविरत प्रयत्नांमुळे आज गोमंतकातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळ एका बुलंद उंचीवर जात आहे. यशोशिखर गाठण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे.

आज काळाची गरज ओळखून गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील चाळीस हजार दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन प्रारंभ करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त आर्थिक साहाय्यातून राज्यातील ग्रामीण भागांमध्ये नवीन सुसज्ज ग्रामीण वाचनालये बांधण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यासोबतच 77 विद्यमान पंचायत वाचनालयांचे अद्ययावत नूतनीकरणही हाती घेण्यात येत आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेले बिगर सरकारी ग्रंथालयातील ग्रंथपालांचे मानधनही नुकतेच वाढविण्यात आले आहे. त्याचबरोबर सदर बिगर सरकारी वाचनालयांना देण्यात येणारे वार्षिक अनुदानही वाढवून 80 हजारपर्यंत नेण्यात आले आहे.
याशिवाय फोंडा येथे एक भव्यदिव्य इको फ्रेंडली ग्रंथालय, साखळी येथे आधुनिक डिजिटल ग्रंथालय, कुडचडे येथे अद्ययावत तालुका ग्रंथालय उभारण्याचे प्रयत्न चालू आहेत. याशिवाय संपूर्ण देशात आदर्श ठरू शकेल असे ‘ग्रंथालय धोरण’सुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचले असून, लवकरच ते सरकारच्या मान्यतेस पाठवून जाहीर करण्यात येणार असल्याचेही कला व संस्कृती खात्याचे मंत्री श्री. गोविंद गावडे यांनी सध्या चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनात सांगितले आहे.
या सर्व गोष्टींचा विचार केल्यास गोमंंतकीय ग्रंथालय चळवळ सध्या सुवर्णमयी टप्प्यातून जात आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.