सुवर्णप्राशन ः मुलांसाठी वरदान

0
42
  • डॉ. सुमोद खेडेकर
    (आयू-बालरोगतज्ज्ञ, शिरोडा)

संपूर्ण भारतभर असलेल्या आयुर्वेदाच्या राष्ट्रीय संस्था आणि संशोधन केंद्रांमध्ये सुवर्णप्राशनावर विविध संशोधनात्मक काम झालेले आहे, ज्याच्या निष्कर्षावरून असे सिद्ध झाले आहे की सुवर्णप्राशनाचे बालकांच्या शरीरावर तसेच बुद्धीवर उत्कृष्ट परिणाम होतात.

स्वास्थ्य रक्षण आणि रोगमुक्ती हे ध्येय बाळगून प्राचीन काळापासून विकसित असलेले आणि सध्याच्या काळात अत्यंत लोकप्रिय असलेले वैद्यक शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदातील ८ अतिविकसित शाखांमध्ये लहान मुलांच्या आरोग्यासंबंधी शाखा म्हणजे कौमारभृत्य- बालरोग. या शाखेचे जनक आचार्य काश्यप यांनी इ.स. पूर्व सातव्या शतकात लिहिलेल्या ‘काश्यप संहिता’ या ग्रंथात बालसंगोपन तसेच बालरोग चिकित्सा यांबद्दल विस्तृत माहिती वर्णन केली आहे. त्यामधील एक महत्त्वाचे आणि अत्यंत लोकप्रिय असे सुवर्णप्राशन!
आरोग्याचे रक्षण हे मनुष्याच्या जन्मतःच सुरू व्हावे आणि बालकांची मानसिक आणि शारीरिक वाढ होऊन त्यांना उत्तम आरोग्य संपन्न आयुष्य मिळावे म्हणून काश्यप संहितेतील लेहानाध्याय यामध्ये सुवर्णप्राशनाचा प्रथमतः उल्लेख आढळतो.
‘सुख दुःखं हि बालानां दृष्यते लेहानाश्रयं|’
या अध्यायात वर्णित सूत्रात आचार्य काश्यप म्हणतात की लहान मुलांचे सुख (म्हणजे आरोग्य) आणि दुःख (म्हणजे अनारोग्य) हे लेहन विधीवर अवलंबून असते. लेहन म्हणजे आयुर्वेदातील वर्णित औषधिद्रव्ये, मध आणि तुपासोबत लहान मुलांना नियमितपणे चाटवणे. याच अध्यायात विविध लेहन योग सांगताना सुवर्णप्राशन याचा उल्लेख केला आहे. चला तर जाणून घेऊया सुर्वप्राशनाबद्दल शास्त्रीय माहिती.

  • सुवर्णप्राशन म्हणजे काय?
    सुवर्णप्राशन या विधीमध्ये सुवर्ण (सुवर्णाचे अतिसूक्ष्म कण शुद्ध आणि विरघळणार्‍या रूपात) मध आणि तूप यांबरोबर संयोग करून किंवा विशिष्ट औषधांचे संयोग मध आणि तुपाबरोबर चाटण स्वरूपात लहान मुलांना नियमित स्वरूपात दिले जातात.
  • सुवर्णप्राशन कोणास द्यावे???
    ० – १६ वर्षीय बालकांना
  • कोणास द्यावे? –
  • आईचे दूध ज्या बालकांना कमी मिळते/मिळत नाही.
  • बालक वात आणि पित्ताच्या आजाराने पीडित असतो.
  • स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी
  • कुपोषित बालक/वजन वाढवण्यासाठी.
  • अनिद्रा, अत्याग्नि, मलावष्टंभ इ. व्याधींमध्ये.
  • कोणास देऊ नये? –
    ज्वर, कास, अतिसार इ.सारख्या व्याधींमध्ये (रोगाच्या तीव्र संसर्गाच्या टप्प्यात)
  • सुवर्णप्राशनाचे लाभ
  • बुद्धिवर्धक/स्मृतिवर्धक
  • पचनशक्ती वाढवते.
  • वेगवेगळ्या संक्रामक आजारांपासून संरक्षण करते.
  • व्याधी प्रतिकारशक्ती वाढवून आयुष्य वाढवते.
  • मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करते.
    हे घेतल्याने काही दुष्परिणाम होतात का??
    नक्कीच नाही. आयुर्वेद हे एक वैद्यक शास्त्र असून जर औषध शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले असेल आणि आयुर्वेद शास्त्राचा जाणकार असलेल्या तज्ञ डॉक्टरांकडून त्याची अर्हता/अनर्हता लक्षात घेऊन ते वापरले तर लहान मुलांमध्ये निश्चितच चांगले परिणाम घडवून आणते. सुवर्णप्राशनामध्ये वापरले जाणारे सुवर्ण/औषधी द्रव्ये यथायोग्य क्रियेतून (शोधन-मारणादि प्रक्रियेतून) तयार केले जाते, ज्यामुळे ते सेवन करण्याकरिता निर्धोक असते. या विपरीत सोशल मिडिया डॉक्टर्स किंवा ऑनलाइन मार्केटिंग, जाहिराती इ. किंवा रजिस्टर्ड नसलेल्या आयुर्वेदिक वैद्यांकडून जर तुम्ही ते वापरत असाल तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून जवळच्या आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते मुलांना द्यावे.
  • संशोधनात्मक निष्कर्ष –
    संपूर्ण भारतभर असलेल्या आयुर्वेदाच्या राष्ट्रीय संस्था आणि संशोधन केंद्रांमध्ये सुवर्णप्राशनावर विविध संशोधनात्मक काम झालेले आहे, ज्याच्या निष्कर्षावरून असे सिद्ध झाले आहे की सुवर्णप्राशनाचा बालकांच्या शरीरावर तसेच बुद्धीवर उत्कृष्ट परिणाम होतो आणि ते लहान मुलांमध्ये देण्यासाठी सुरक्षित आहे. सुवर्णप्राशनामध्ये उपयुक्त सुवर्ण हे शरीरास धोकादायक असते किंवा आयुर्वेदाचे मेटॅलिक प्रिपरेशन्स हे नेफ्रॉटॉक्सिक असतात असा एक विलक्षण गैरसमज आहे किंवा तो निर्माण केला जातो. परंतु वास्तविक पाहता विविध प्रक्रिया करून विविध धातूंचे शरीरासाठी उपयुक्त अशा परमाणूंमध्ये रूपांतर करून नंतरच त्यांचा वापर औषधी निर्माण करण्यासाठी केला जातो. गोव्यात सुवर्णप्राशनाला अधिक लोकप्रियता प्राप्त झाली आहे. दर महिन्याला सुमारे ८-१० हजार मुले याचा लाभ घेतात. सध्याच्या कोविड-१९च्या काळात मुलांचे आरोग्य जोपासण्याकरिता सर्व पालकांनी वेळात वेळ काढून आपल्या मुलांना विश्वासार्ह आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन सुवर्णप्राशन देणे निश्‍चितच फायद्याचे ठरेल.