सुर्लात ३० दिवस दारूविक्री बंदी आदेश

0
163

सत्तरी तालुक्यातील ठाणे – डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील सुर्ला गावात तीस दिवसांसाठी दारू विक्री बंदीचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी लेविसन्स मार्टीन्स यांनी काल जारी केला.

हा दारू विक्री बंदीचा आदेश उद्या शुक्रवार २० पासून लागू होणार आहे. सुर्ला गावातील दारू दुकाने, बार, पब, क्लब वा पुरवठा दुकानातून तीस दिवसांसाठी दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

हा दारू बंदी आदेश डावलून दारू विक्री करणार्‍यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस, अबकारी व संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केली आहे.
सुर्ला गावातील दारू बंदीचा विषय गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. या गावातील नागरिकांनी एक सभा घेऊन पर्यटकांचा उपद्रव सहन करावा लागत असल्याने गावात दारू बंदी करण्याची मागणी केली होती. या ग्रामस्थांनी स्थानिक आमदार प्रतापसिंह राणे यांना एक निवेदन सादर करून दारू बंदीची मागणी केली होती.

कर्नाटक राज्यातील सीमाभागातील पर्यटक पावसाळ्यात सुर्ला गावात दारू पिण्यासाठी येतात. पर्यटक दारूच्या नशेत दंगामस्ती, बेशिस्त वर्तन करीत असल्याची तक्रार आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वाळपई पोलीस स्टेशनला निवेदन सादर करून दारू बंदी करण्याची मागणी केली. रस्ता, उघड्यावर दारूचे सेवन केले जात असल्याने नागरिकांना उपद्रव सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी एक अहवाल विभागीय अधिकार्‍यांना सादर केला. विभागीय अधिकार्‍यांनी सदर अहवाल उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना पाठविल्यानंतर सुर्ला गावात दारू बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.