सुर्ला-सत्तरी येथे एका 17 वर्षीय विद्यार्थिनीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. भाग्यश्री देऊ पिंगळे असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती शाळेला जात असताना तिच्यावर अस्वलाने हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या हल्ल्यात भाग्यश्री हिच्या तोंडाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.
पर्ये येथील उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असलेली भाग्यश्री बुधवारी सकाळी शाळेला जाण्यासाठी निघाली होती. कदंब बस पकडण्यासाठी ती पायी चालत बसथांब्याजवळ येत होती. तिच्यासोबत तिची आजी आणि बहीण देखील होती. मात्र रस्त्याने चालत त्या दोघींना मागे टाकत भाग्यश्री बरीच पुढे लांबवर पोहोचली होती. वाटेत वन खात्याच्या फाटकाच्या जवळील वळणावर अचानक अस्वलाने तिच्यावर हल्ला केला. त्या अस्वलासोबत दोन पिल्ले होती. भाग्यश्री हिच्या पाठीवर अस्वलाने उडी टाकली. त्याबरोबर ती किंचाळत रस्त्यावर कोसळली. तिची बॅग तुटून खाली पडली. तिचा आवाज ऐकून गेटवरील दोन वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिने बॅग उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पुन्हा ते अस्वल तिच्या अंगावर धावून आले. पण वन कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यामुळे ते पिलांसोबत पसार झाले. या हल्ल्यात भाग्यश्रीच्या तोंडाला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळपईतील वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन भाग्यश्री हिची विचारपूस केली.