पणजी पालिकेचा विचार ; नगरसेवकात सहमती : महापौर
पणजी शहरातील रस्त्यांवर पे पार्किंग सुरू करण्यासंबंधीच्या प्रस्तावाविषयी महापालिका गंभीर असून हे पे पार्किंग एकदम सर्व रस्त्यांवर सुरू न करता पहिल्या टप्प्यात केवळ १८ जून मार्गावर ते सुरू करण्याबाबत महापालिका विचार करीत असल्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.१८ जून परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी होत असते. पणजी बाजारात शॉपिंगसाठी येणारे लोक मोठ्या संख्येने या रस्त्यावर वाहने पार्क करून ठेवत असतात. त्यामुळे वाहतुकीची रोज कोंडी होत असते. या रस्त्यावर पे पार्किंग सुरू केले की तेथील वाहतुकीला शिस्त येऊ शकेल, असे व्यक्तीश: आपणास वाटत आहे. पार्किंगसंबंधी निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनेही या प्रश्नावर सविस्तर चर्चा केलेली आहे.
पालिकेने ज्या १५-१६ परिसरात पे पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्या सर्व परिसरात एकाच वेळी पे पार्किंग सुरू करण्यास लोकांचा विरोध आहे. जनतेचा हा विरोध लक्षात घेऊन महापालिकेतील बहुतेक नगरसेवकानी एकाच वेळी या सर्व रस्त्यावर पे पार्किंग सुरू करण्यास आपलाही विरोध व्यक्त केला होता. त्यामुळे महापालिका मंडळाच्या बैठकीत पे पार्किंगला संमती मिळू शकली नव्हती. परिणामी महापालिकेने त्यावर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासाठी सहा नगरसेवकांची एक समितीही निवडली होती.
पहिल्या टप्प्यात १८ जून मार्गावर पे पार्किंग सुरू केले जावे याबाबत आता नगरसेवकांमध्ये एकमत होऊ लागले असल्याचे फुर्तादो यांनी सांगितले.