पर्रीकर यांचे मात्र मौन
देशाच्या सुरक्षेशी काही माजी पंतप्रधानांनी तडजोड केली होती या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोपासंदर्भात कॉंग्रेसने गदारोळ माजविलेला असला, तरी प्रत्यक्षात हे आरोप दोन बिगर कॉंग्रेसी पंतप्रधानांच्या काही निर्णयांसंबंधात असावेत असे संकेत मिळत आहेत. मोरारजी देसाई आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांकडे पर्रीकर यांनी अंगुलीनिर्देश केला असण्याची शक्यता आहे. स्वतः पर्रीकर यांनी मात्र आपण केलेल्या आरोपांसंदर्भात जाहीरपणे वक्तव्य न करणे पसंत केले आहे.जनता दल सरकारच्या काळात पंतप्रधानपदी आलेल्या मोरारजी देसाई यांनी पाकिस्तानच्या अत्यंत गोपनीय असलेल्या आण्विक कार्यक्रमाची भारताला माहिती असल्याचे तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष झिया उल हक यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात सांगून टाकले होते. त्यामुळे झिया सावध झाले आणि त्यांना भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ च्या पाकिस्तानमधील वावरासंबंधी सुगावा लागला व परिणामी भारताला आपले गुप्तचर परत बोलवावे लागले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
इंद्रकुमार गुजराल पंतप्रधानपदी आल्यावर त्यांनी सर्वप्रथम पाकिस्तानमधील ‘रॉ’चा कृतिकार्यक्रम बंद पाडला होता असेही या सूत्रांनी सांगितले. गुजराल यांना ‘रॉ’च्या अशा प्रकारच्या मोहिमेचा तिटकारा होता आणि त्यांनी इंटेलिजन्स ब्यूरोलाही भारतात वावरणार्या पाकिस्तानी एजंटांसंदर्भात नरमाईचे धोरण स्वीकारण्यास भाग पाडले होते, असा आरोप या सूत्राने केला. पाकिस्तानशी शांतीवार्तेस चालना देण्यासाठी गुजराल यांनी हे केेले असे त्याने सांगितले. गुजराल हे युनायटेड फ्रंटच्या सरकारमध्ये पंतप्रधान होते. देवेगौडा यांच्या युनायटेड फ्रंटच्या सरकारचा पाठिंबा कॉंग्रेसने काढून घेतला, तेव्हा युनायटेड फ्रंटने नवा नेता निवडण्याच्या बोलीवर त्या सरकारला पुन्हा पाठिंबा देण्याची तयारी कॉंग्रेसने दर्शवली होती व त्यामुळे इंद्रकुमार गुजराल यांची युनायटेड फ्रंटच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर देशाचे तेरावे पंतप्रधान म्हणून गुजराल यांनी शपथ घेतली. १९९७-९८ मध्ये ते पंतप्रधान होते. देशाच्या दोन माजी पंतप्रधानांनी संरक्षणविषयक बाबींशी तडजोड केली हा पर्रीकर यांचा आरोप वरील दोन्ही घटनांसंदर्भात असावा असा कयास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे सध्या गोव्यात असून त्यांनी या विषयावर जाहीर गौप्यस्फोट करणे टाळले. आपण आपल्या विधानासंदर्भात पुरावे देणार आहात की माफी मागणार आहात, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्यांनी मौन पाळले.
देशाच्या सुरक्षिततेसंबंधी दीर्घकालीन योजना आखणे आवश्यक असते, त्यासाठी वीस – तीस वर्षे खर्ची पडतात, परंतु या देशाला असेही पंतप्रधान लाभले की ज्यांनी या सुरक्षिततेशी संबंधित बाबींकडे तडजोड केली असे पर्रीकर यांनी म्हटले होते. त्यावरून कॉंग्रेसने गदारोळ माजवीत एक तर पर्रीकरांनी पुरावे द्यावेत किंवा माफी मागावी अशी मागणी केली होती.