सुरक्षित वातावरण हवेच

0
17

कोलकात्यातील सरकारी इस्पितळातील डॉक्टरवरील बलात्कार आणि तिच्या हत्येने देश हादरून गेला आहे. त्यामुळे खुद्द वैद्यकीय व्यवसायातील मंडळी – डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारीही हादरले असतील तर नवल नाही. त्यामुळे आपल्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी त्यांनी नुकताच संप पुकारला. अर्थात, वैद्यकीय सेवा ही जीवनावश्यक सेवा असल्याने डॉक्टर आणि परिचारिकांनीच संपाचे हत्यार उपसल्याने देशभरात रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला. आपत्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा सुरू होत्या, परंतु पूर्वनियोजित शस्त्रक्रिया, इस्पितळांचे बाह्य रुग्ण विभाग आदींवर ह्या संपाचा फार मोठा परिणाम झाला. कोलकात्यातील घटना अत्यंत निंद्य आणि निषेधार्ह निश्चित आहे, परंतु कामाच्या ठिकाणावरील सुरक्षितता, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही सर्वच क्षेत्रांना आवश्यक आहे, केवळ डॉक्टरांनाच नव्हे. रुग्ण हा आधीच शारीरिक, मानसिक, आर्थिक ताणतणावाने ग्रासलेला असतो. त्यात त्याला अशा प्रकारच्या संपाला सामोरे जाण्यास भाग पाडणे अर्थातच गैर होते व ते टाळता आले असते. कोलकात्यातील घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करणे किंवा वैद्यकीय सेवेमध्ये खंड न पाडता आलटून पालूटन काम करून त्या सुरू ठेवणे शक्य होते, परंतु सरसकट संप पुकारला गेला. असा संप केला गेला तरच सरकार दखल घेते असा संप पुकारणाऱ्यांचा युक्तिवाद होता, परंतु वैद्यकीय विश्वाच्या सुरक्षिततेबाबत संप न पुकारताही आपल्या मागण्या धसास लावता आल्या असता. वैद्यकीय संघटनांना लढाऊ कामगार संघटनांची अवकळा येऊ देणे गैर आहे. पोलीस, अग्निशामक दल, वैद्यकीय क्षेत्र, सफाई कर्मचारी, पत्रकारिता आदी क्षेत्रांना वर्षाचे 365 दिवस अहोरात्र सेवा द्यावी लागते. ती त्या क्षेत्राची गरजच आहे. ही बलात्काराची घटना पश्चिम बंगालमध्ये झाली म्हणून वृत्तवाहिन्यांनी एवढी लावून धरली आहे. भाजपचे सरकार असलेल्या एखाद्या राज्यात ती घडली असती, तर किती प्रसारमाध्यमे आणि संघटना अशा निषेधासाठी पुढे आल्या असत्या हाही प्रश्नच आहे. उत्तराखंडमध्ये कामावरून घरी जाणाऱ्या एका परिचारिकेवर नुकताच बलात्कार झाला. त्याबाबत कुठे आवाज उठलेले दिसत नाहीत. काही असो, वैद्यकीय क्षेत्रासाठीच नव्हे, तर एकूणच सेवाक्षेत्रासाठी कामावरील सुरक्षा हा विषय गांभीर्याने घेतला जाणे जरूरी आहे. मुख्यत्वे ती जबाबदारी संबंधित आस्थापनांची आहे. वेळीअवेळी कामावर येणाऱ्या, रात्रपाळीत कित्येक तास काम करून थकून भागून तेथेच विश्रांती घ्यावी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज व सुरक्षित विश्रांतीकक्ष असणे, त्यांच्या कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे, प्रशिक्षित सुरक्षारक्षक असणे ह्या गोष्टी निश्चितपणे आवश्यक आहेत. त्यासंबंधी सरकारला जागण्यासाठी असे एखादे पाशवी बलात्कार व हत्या प्रकरण घडण्यापर्यंत थांबण्याची जरूरी नव्हती. अनेक वर्षांपूर्वी मुंबईत एका रुग्णालयात अरुणा शानभागवर वॉर्डबॉयने अत्याचार केले आणि तिचे जीवन नरक बनवले. त्या घटनेने देश असाच हादरला होता. परंतु त्यानंतर एवढ्या वर्षांनीही वैद्यकीय क्षेत्रावर आपल्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची मागणी करावी लागत असेल तर निश्चितपणे त्यात त्रुटी राहिलेली आहे. वैद्यकीय विश्वाच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय कायदा हवा अशी मागणी आता पुढे आलेली आहे आणि तिचा विचार झाला पाहिजे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार, रुग्णांशी गैरवर्तन वा त्यांच्यावरील उपचारांबाबत हलगर्जी, फार्मा कंपन्यांची गैरकृत्ये व हितसंबंध वगैरेंबाबतही सरकारने कायदे जरूर आणावेत. गोव्यातही डॉक्टरांच्या संपाचा परिणाम जाणवला. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर व परिचारिकांच्या सेवेचा मुद्दा पुढे आला. रात्रीबेरात्री डॉक्टरांना वेगवेगळ्या वॉर्डांत जावे लागते, मुख्य इमारतीमधून बाजूच्या ब्लॉकमध्ये किंवा रक्तपेढीत जावे लागते. अशावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी त्या सर्व मार्गांवर पुरेसे दिवे असायला हवेत, कॅमेरे हवेत, सुरक्षारक्षक हवेत ह्या मागण्या पुढे आल्या आहेत. ह्या अगदी मूलभूत गोष्टी आहेत व त्यासंदर्भात आजवर हेळसांड का झाली ह्याचा जबाब आधी महाविद्यालयाच्या अधीक्षकांनी देणे जरूरी आहे. आता म्हणे गोमेकॉच्या सुरक्षारक्षकांना पोलिसांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. केवळ सत्तरीतून सुरक्षारक्षकांचा भरणा केला जात होता, तेव्हा ते प्रशिक्षित असायला हवेत ह्याचे शहाणपण आलेले नसावे. सरकारने वैद्यकीय सुरक्षेच्या विषयावर समितीची घोषणा केली आहे. एखाद्या प्रश्नावर वेळ मारून न्यायची झाली की समित्या काढल्या जातात. ह्याचे तसे होऊ नये. राज्यातील सर्व आस्थापनांतील सुरक्षा आणि सुविधा यांचा आढावा ह्यानिमित्ताने सरकारने घ्यावा आणि विशेष करून महिला सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात. केवळ रुग्णालयेच नव्हेत, रात्रीबेरात्री काम चालणारी सर्वच आस्थापने कर्मचाऱ्यांसाठी, विशेषतः महिलांसाठी सुरक्षित असतील ह्याची खबरदारी घ्यावी.