सुरक्षा रक्षकांचे आंदोलन तूर्त मागे

0
100
खासदार नरेंद्र सावईकर व उपसभापती अनंत शेट यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन आंदोलन सोडताना आंदोलनकर्ते कर्मचारी. (छाया : किशोर नाईक)

सहा महिन्यांच्या आत मागण्या पूर्ण करणार : मुख्यमंत्री
गेल्या १२ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर असेलल्या गोवा रोजगार व भरती सोसायटीच्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी काल दुपारी आपले आंदोलन तूर्त मागे घेतले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मागण्या सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे हे आंदोलन तूर्त मागे घेण्याचा निर्णय कामगार संघटनेने घेतल्याचे या कर्मचार्‍यांचे नेते ऍड. अजितसिंह राणे व स्वाती केरकर यांनी काल सांगितले.सरकारच्या वतीने काल उपसभापती अनंत शेट व खासदार नरेंद्र सावईकर यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांशी व त्यांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषणावर बसलेल्या कर्मचार्‍यांना नरेंद्र सावईकर व अनंत शेट यांनी लिंबूपाणी देऊन उपोषण मागे घ्यायला लावले.
परवा मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेतले जाणार होते. पण मुख्यमंत्र्यानी लेखी आश्‍वासन द्यावे अशी मागणी नेत्यानी केल्याने व मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्‍वासन देण्यास नकार दिल्याने तोडगा निघू शकला नव्हता. या पार्श्‍वभूमीवर पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांनी नेत्यांना प्रकरण आणखी ताणून धरले जाऊ नये. मुख्यमंत्र्यांनी जे आश्‍वासन दिलेले आहे त्याला मान देऊन आंदोलन मागे घेतले जावे, अशी विनंती केली होती. त्यामुळे आम्हीही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून प्रकरण आणखी न ताणण्याचा निर्णय घेतल्याचे ऍड. राणे व केरकर यांनी सांगितले. मात्र, जर सरकारने सहा महिन्यांपूर्वी सकारात्मक अशी पावले उचलली नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचे कामगार नेत्यांनी स्पष्ट केले.
या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर सर्व कर्मचार्‍यांना उद्या सोमवारपासून कामावर रुजू होण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. मात्र, उपोषण केलेल्या कर्मचार्‍यांची प्रकृती खालावलेली असल्याने त्यांना आठवडाभराची सुटी देण्यात यावी, अशी वरील नेत्यांनी केलील विनंती मान्य करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.