सुरक्षा रक्षकांचे आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न

0
103
कस्टम्स हाऊसनजीक रस्त्याच्या कडेला उपोषणास बसलेल्या सुरक्षा रक्षकांना पाण्याचे फवारे मारून तेथून हुसकावण्यात आले. त्यामुळे प्रामुख्याने महिला सुरक्षा रक्षकांनी मांडवी हॉटेलसमोरील रस्त्यावर बसकण मारली त्यावेळी. (छाया : किशोर नाईक)

२० जणांची प्रकृती खालावली
संपावर गेलेले सुरक्षा रक्षक व गोवा भरती व रोजगार सोसायटी यांच्यात कोणताही समझोता होऊ न शकल्याने या सुरक्षा रक्षकांचे आंदोलन कालही चालू होते. या सुरक्षा रक्षकांनी काल बंदर कप्तान इमारतीसमोरून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला. तसेच आपले बेमुदत उपोषण यापुढे आझाद मैदानावर चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, हे आंदोलन मोडून काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सरकारकडून केला जात असून काल बंदर कप्तान इमारतीसमोर उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर टँकरद्वारे पाणी आणून त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. तसेच आंदोलनकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी १४४ हे जमावबंदी कलमही पणजी शहरात लागू करण्यात आल्याचे आंदोलन कर्त्यांचे नेते अजितसिंह राणे व स्वाती केरकर यांनी सांगितले. ही एक प्रकारची दडपशाही असून या दडपशाहीला आंदोलनकर्ते बळी पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२० जणांची प्रकृती खालावली
दरम्यान, उपोषणकर्त्यांपैकी २० जणांची प्रकृती काल खालावली. मोर्चाच्या वेळी त्यांना भोवळ आल्याने त्यांना इस्पितळात हलवावे लागले. मात्र, इस्पितळात हलवण्यासाठी १०८ रुग्णवाहिका वेळेवर पोचू न शकल्याने यापैकी बर्‍याच जणांना पोलिसांच्या गाडीतून इस्पितळात हलवावे लागले.
नव्या लोकांना घेतल्यास सहन करणार नाही : इशारा
पर्यायी व्यवस्थेच्या नावाखाली आंदोलन करणार्‍या सुरक्षा रक्षकांच्या जागी नव्या लोकांना सेवेत घेण्याचा प्रयत्न झाल्यास ते सहन केले जाणार नाही. सरकारने तशी कृती केल्यास पुढे जे काही होईल त्याला सरकारच जबाबदार राहील असे अजितसिंह राणे व स्वाती केरकर यांनी सांगितले.