सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

0
8

>> कर्जतमध्ये स्वत:च साकारलेल्या एनडी स्टुडिओत संपवली जीवनयात्रा; आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत काल आत्महत्या केली. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आपला जीवनप्रवास संपवला. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये, तसेच इतिहासकालीन मालिकांमध्ये कलादिग्दर्शनाचे काम केले. त्यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, शुक्रवारी एनडी स्टुडिओ येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

उद्या होणार अंत्यसंस्कार
नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची मुलगी आणि जावई परदेशात असतात. ते गुरुवारी मुंबईत पोहोचणार आहेत. तोपर्यंत देसाईंचा मृतदेह मुलुंडमधील एका रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात येणार आहे.

आर्थिक अडचणींचा सामना
गेल्या काही दिवसांपासून नितीन देसाई यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्यामागे हेच कारण असल्याचेही सांगितले जात आहे. एन. डी. स्टुडिओवर तब्बल 249 कोटींचे कर्ज होते आणि ते थकित असल्याने त्यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाईही प्रलंबित होती.

चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
नितीन देसाई यांना त्यांच्या उत्तुंग कारकिर्दीमध्ये चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याशिवाय, त्यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी फिल्म फेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओत होते. देसाई मंगळवारी रात्री दिल्लीहून मुंबईला विमानाने परतले. रात्रीच ते कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये पोहोचले. त्यांनी तिथल्या व्यवस्थापकाला उद्या सकाळी मी व्हॉईस रेकॉर्डर देतो, असे सांगितले. व्यवस्थापकाने बुधवारी सकाळी व्हॉईस रेकॉर्डरसाठी त्यांच्याशी संपर्क केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर काल सकाळी एनडी स्टुडिओमधील मेगाहॉलजवळील ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या शोच्या सेटवरच काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत ते दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला.

चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे. जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. 1987 सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.

कर्जतमध्ये एनडी स्टुडिओ उभारला
2005 मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे 52 एकर (21 हेक्टर) मध्ये पसरलेला एनडी स्टुडिओ सुरू केला. हिंदी आणि मराठीतील ऐतिहासिक चित्रपट आणि मालिका म्हणजे नितीन देसाई यांचे कला दिग्दर्शन आणि भव्य सेट्स हे समीकरणच बनले होते. पुढे हेच ऐतिहासिक सेट्स आणि कलात्मक वस्तू एकत्र करत त्यांनी कर्जत येथे भव्यदिव्य एन. डी. स्टुडिओ उभारला.