बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ओपीडीसाठी रांगेत थांबलेल्या रुग्णांसाठी संबंधित ओपीडी टोकन क्रमांक देण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता सकाळी 8 वाजता संबंधित ओपीडीसाठी टोकन क्रमांक नोडल अधिकाऱ्याने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याकडून दिले जाणार आहेत.
यापूर्वी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध ओपीडी तपासणीसाठी टोकन क्रमांक सकाळी 7 वाजता दिले जात होते. या ओपीडी तपासणी टोकन क्रमांकासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना सकाळी 6 वाजल्यापासून रांगेत उभे राहून टोकन क्रमांक घ्यावे लागत होते. काही व्यक्ती विविध ओपीडीसाठी टोकन क्रमांक घेऊन इस्पितळात ओपीडीमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना त्याची विक्री करीत असल्याची तक्रार होती. त्यामुळे आता टोकन क्रमांक देण्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टोकन क्रमांक घेतल्यानंतर संबंधित ओपीडीसाठी रुग्णाला नोंदणी करावी लागणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी जारी केले आहे.