>> मुख्यमंत्री पर्रीकर : ३६५ कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी
वैद्यकीय केंद्रस्थान (मेडिकल हब) बनण्याच्या दिशेने गोव्याचा प्रवास यापूर्वीच सुरू झालेला आहे. आज पायाभरणी होत असलेला सुपर स्पेशालिटी विभाग व लवकरच होणार असलेला कर्करोग सुपर स्पेशालिटी विभाग प्रत्यक्षात साकारल्यानंतर गोवा खर्या अर्थाने गेल्या वैद्यकीय केंद्रस्थान बनेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील नियोजित सुपर स्पेशालिटी विभागाची पायाभरणी कला अकादमी येथे आयोजित कार्यक्रमात केल्यानंतर ते बोलत होते.
पर्रीकर म्हणाले, आज पायाभरणी करण्यात आलेला गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी विभाग दोन वर्षांत उभा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा आजच्या घडीच्या खर्च ३८६ कोटी रु. एवढा असला तरी तो उभा होईपर्यंत खर्च ५०० कोटींवर जाणार असल्याचे त्यांनी केले. गोमेकॉत सुपर स्पेशालिटी कर्करोग विभाग उभारण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच ४४ कोटी रु. मंजूर केले असल्याची माहितीही ह्यावेळी पर्रीकर यांनी दिली. हे दोन्ही विभाग पूर्ण झाले की गोमेकॉत इस्पितळ हे देशातील एक आघाडीचे इस्पितळ बनणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
म्हणून परराज्यातून रुग्ण
येतात : मुख्यमंत्री
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत आणि म्हणूनच परराज्यातूनही गोमेकॉत उपचारासाठी रुग्ण येत असल्याचे पर्रीकर म्हणाले. गोमेकॉवरील ताण त्यामुळे वाढत होता आणि म्हणूनच राज्यााबाहेरून येणार्या रुग्णांकडून माफक शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे परराज्यातून येणार्या रुग्णांची संख्या फक्त ४ ते ५ टक्क्यांनी कमी झाली. त्यांच्याकडून शुल्कापोटी सरकारला सुमारे ४० लाख रु.चा महसूल प्राप्त झाला.
दिनदयाळ योजनेमुळे
ताण कमी झाला
दिनदयाळ सामाजिक सुरक्षा योजनेमुळेही गोमेकॉवरील ताण कमी झाला असल्याचे सांगताना ते म्हणाले की ह्या आरोग्य विमा योजनेचा लाभ घेत राज्यातील १४ हजार लोकांनी खासगी इस्पितळात शस्त्रक्रिया करून घेतल्या.
सर्वव्यवहार डिजिटल : विश्वजीत
याप्रसंगी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे म्हणाले की आज ज्या सुपर स्पेशालिटी विभागाच्या पायाभरणी होत आहे तो विभाग एकदा गोमेकॉत उभा झाला की राज्यातील आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडून येणार आहे. ह्या विभागातील सर्व व्यवहार हे डिजिटल पध्दतीने होणार असून पुढे संपूर्ण गोमेकॉतील व्यवहारही डिजिटल पध्दतीने होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर, सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, सांताक्रुझचे आमदार आंतोनियो फर्नांडिस यांचीही यावेळी भाषणे झाली.
यावेळी व्यासपीठावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रदीप नाईक, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिवानंद बांदेकर व जी संस्था ह्या सुपर स्पेशालिटी विभागाची संकल्पना प्रत्यक्षात साकार करणार आहे त्या एच्एस्सीसी ह्या संस्थेचे एक अधिकारी डॉ. ज्ञानेश पांडे आदी मंडळी ह्यावेळी व्यासपीठावर हजर होती. नियोजित सुपर स्पेशालिटी विभागात नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, न्यूरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, कार्डियोलॉजी, एन्डोक्रायनोलॉजी आदीसह ११ सुपर स्पेशालिटी विभाग असतील. ५०० खाटांचा हा विभाग असेल व त्यात १० ऑपरेशन थिएटर्स असतील.