महसूल खात्याने सूपर मूनमुळे २ जानेवारीला समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने सर्तकतेचा इशारा दिला आहे. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या संस्थेने सुपर मूनमुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. २ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ आणि रात्री ११ ते मध्यरात्री २ (दुसरा दिवस) या काळात भरतीमुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढणार आहे. वरील इशार्यामुळे पणजी, वास्को, मुरगाव या जमीन पातळीवरील भागात कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये म्हणून जास्त सर्तकता बाळगण्याची गरज आहे, असे सरकारी पत्रकात म्हटले आहे. ओखी वादळाच्या वेळी राज्यातील समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने अनेक शॅकमध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महसूल खात्याने सर्तकतेचा इशारा दिला आहे. यापूर्वी पर्यटन खात्याने शॅक व्यावसायिक, जलक्रिडा व्यावसायिकांना सर्तकता बाळगण्याचा इशारा दिलेला आहे.