- सुधाकर रामचंद्र नाईक
भारतीय क्रिकेट शौकिनांची उत्सुकता जागविण्यासाठी इंडियन प्रिमियर लीगच्या ‘टी २० इन्स्टंट’ क्रिकेटमधील अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या तथा ‘सुपर ओव्हर’मध्ये उत्कंठावर्धक ठरलेल्या या अकरा थरारक मुकाबल्यांचा हा आढावा…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ‘इंडियन प्रिमियर लीग’च्या तेराव्या पर्वाचा थरार संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू झालेला असून क्रिकेटप्रेमी रात्ररात्र जागून या उत्कंठावर्धक ‘इन्स्टंट’ क्रिकेटचा आनंद उपभोगत आहेत. ‘बीसीसीआय’च्या या अत्यंत लोकप्रिय टी-२० क्रिकेटचा क्रिकेटशौकिनांनी आजवर अंतिम षटकापर्यंत रंगलेल्या बर्याच थरारक अटीतटीच्या लढतींचा श्वास रोखायला लावणारा अनुभव घेतला असून विद्यमान प्रतियोगितेतही गेल्या दोन आठवड्यातच दोन ‘सुपर ओव्हर्स’ मुकाबले रंगले आहेत. ‘आयपीएल’च्या इतिहासात आतापर्यंत अकरा-अकरा सामने अंतिम चेंडूपर्यंत रंगले असून त्याचा निकाल ‘सुपर ओव्हर’मध्येही रंगतदार ठरलेला आहे. राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइटरायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन ‘सुपर ओव्हर्स’ मुकाबले खेळले आहेत. दोन वेळच्या विजेत्या कोलकाता नाइटरायडर्सची ‘सुपर ओव्हर’ मुकाबल्यातील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून त्यांना तिन्ही सामन्यांत अपयश आले आहे.
विद्यमान आयपीएलमधील आतापर्यंतचे दोन्ही ‘सुपर ओव्हर’ सामने दुबई स्टेडियमवर रंगले. पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने के. एल. राहुलच्या अधिपत्याखालील किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात केली तर दुसर्या सामन्यात भारतीय कर्णधार वीराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रोहित शर्माच्या अधिपत्याखालील मुंबई इंडियन्सला ‘सुपर ओव्हर’मधील पहिल्या पराभवाची चव चाखवली.
या उत्कंठावर्धक ‘सुपर ओव्हर’ लढतींचे वैशिष्ट्य म्हणजे पराभूतांना सनसनाटी विजय मिळवून देण्याच्या अपेक्षा उंचावलेले, अनुक्रमे किंग्ज इलेव्हन पंजाबचा मयंक अगरवाल आणि मुंबई इंडियन्सचा इशान किशन हे दोन्ही लढवय्ये अंतिम षटकात ऐन मोक्याच्या क्षणी धाराशायी (बाद) ठरले. गोलंदाजीत मात्र उलट चित्र दिसले असून दिल्ली कॅपिटल्सचा कॅगिसो रबादा पुन्हा एकदा ‘किंग ऑफ सुपर ओव्हर’ ठरला तर मुंबई इंडियन्सला दोन ‘सुपर ओव्हर’मध्ये विजय मिळवून दिलेला जसप्रित बुमराह ‘हॅट्ट्रिक’ नोंदण्यात अयशस्वी ठरला. भारतीय क्रिकेट शौकिनांची उत्सुकता जागविण्यासाठी इंडियन प्रिमियर लीगच्या ‘टी २० इन्स्टंट’ क्रिकेटमधील अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या तथा ‘सुपर ओव्हर’मध्ये उत्कंठावर्धक ठरलेल्या या अकरा थरारक मुकाबल्यांचा आढावा घेणे उचित ठरावे.
२३ एप्रिल २००९ : केपटाऊन, द. आफ्रिका : राजस्थान रॉयल्स वि. वि. कोलकाता नाइटरायडर्स : राजस्थान रॉयल्सच्या २० षटकांतील ६ बाद १५० धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाइटरायडर्सने शेवटच्या दोन चेंडूवर दोन गडी गमावल्याने ८ बाद १५० अशी बरोबरी झाली. ‘सुपर ओव्हर’मध्ये राजस्थान रॉयल्सला १६ धावांचे लक्ष्य गाठून देताना युसुफ पठाणने ६, २, ६, ४ अशी फटकेबाजी करीत राजस्थानला ‘रॉयल’ विजय मिळवून दिला.
१२ मार्च २०१० : चेन्नई : किंग्ज इलेव्हन पंजाब वि. वि. चेन्नई सुपर किंग्ज : कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या अनुपस्थितीत खेळलेल्या चेन्नईला १३७ धावांच्या छोट्या लक्ष्याच्या पाठलागात १२.२ षटकांतील १ बाद ९६ वरून निर्धारित २० षटकांत ७ बाद १३६ पर्यंतच मजल गाठता आली आणि अखेर ‘सुपर ओव्हर’मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने १० धावांचे लक्ष्य आरामात साध्य केले.
७ एप्रिल २०१३ : हैदराबाद : सनरायझर्स हैदराबाद वि. वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : ‘लो स्कोअरिंग’ सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने प्रथम फलंदाजीत ८ बाद १३० धावा केल्या, पण नंतर प्रभावी गोलंदाजीत सनरायझर्सला निर्धारित षटकांत ७ बाद १३० वर रोखले. ‘सुपर ओव्हर’मध्ये कॅमेरून व्हाइटने ठोकलेल्या दोन षटकारांवर सनरायझर्सने २० धावांचे आव्हान खडे केले पण आरसीबीला प्रत्युत्तरात १५ धावापर्यंतच मजल गाठता आली.
१६ एप्रिल २०१३ : बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. वि. दिल्ली डेयरडेविल्स : नऊ दिवसांत रॉयल चॅलेंजर्सला दुसर्यांदा ‘सुपर ओव्हर’च्या दिव्यातून गुजरावे लागले, पण अखेर यावेळी बाजी मारण्यात यश आले. दिल्ली डेयरडेविल्सने दिलेल्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वीराट कोहली (६५) आणि ए. बी. डिविलियर्स (३९) यांनी केलेल्या १०३ धावांच्या भागीवर रॉयल चॅलेंजर्सने दमदार वाटचाल केली होती. पण नंतर आकस्मिक घसरगुंडीत १७ चेंडूत २ बाद १२९ वरून ७ बाद १३८ अशी घसरगुंडी घडली. रवी रामपॉल आणि विजयकुमार यांनी अंतिम षटकात ११ धावा जमवीत सामना ‘टाय’ केला आणि अखेर रवी रामपॉलने ‘सुपर ओव्हर’मध्ये दोन बळी घेत रॉयल चॅलेंजर्सला विजय मिळवून दिला.
२९ एप्रिल २०१४ : अबुधाबी : राजस्थान रॉयल्स वि. वि. कोलकाता नाइटरायडर्स : राजस्थान रॉयल्सच्या ५ बाद १५२ धावांच्या पाठलागात कोलकाता नाइटरायडर्सला शेवटच्या दोन षटकांत १६ धावांची गरज होती आणि ६ गडीही शेष होते. पण राजस्थानच्या जेम्स फॉल्कनरने अंतिमपूर्व षटकात भेदक गोलंदाजीत ३ बळी घेत कोलकाताच्या आगेकूचीवर ‘ब्रेक’ लावला आणि अखेर केकेआरला ८ बाद १५२ पर्यंतच मजल गाठता आली आणि सामना ‘टाय’ ठरला. ‘सुपर ओव्हर’मध्ये उभय संघांनी प्रत्येकी अकरा धावाच नोंदल्या, पण राजस्थान रॉयल्सने बिनबाद १० तर नाइटरायडर्सने २ बाद ११ धावा केल्या. अखेर ‘बाउंड्री काउंटबॅक’ नियमावलीनुसार राजस्थान रॉयल्सला विजेता घोषित करण्यात आले.
२१ एप्रिल २०१५ : अहमदाबाद : किंग्ज इलेव्हन पंजाब वि. वि. राजस्थान रॉयल्स : १९२ धावांच्या उद्दिष्टाच्या पाठलागातील किंग्ज इलेव्हन पंजाब सामना गमावणार असे वाटत असतानाच अक्षर पटेलने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकीत संघाला ६ बाद १९१ चा टप्पा गाठून देत सामना ‘टाय’ बनविला. ‘सुपर ओव्हर’मध्ये शॉन मार्शने जेम्स फॉल्कनरच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार ठोकीत किंग्ज इलेव्हनला १ बाद १५ अशी धावसंख्या गाठून दिली. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला दोन गडी गमावत केवळ ६ धावाच जमविता आल्या.
२९ एप्रिल २०१७ : राजकोट : मुंबई इंडियन्स वि. वि. गुजरात लायन्स : गुजरात लायन्सच्या ९ बाद १५३ धावांच्या पाठलागातील मुंबई बाजी मारणार असे वाटत असतानाच रविंद्र जडेजाने अंतिम क्षणात जसप्रित बूमराह आणि कृणाल पांड्या यांना थेट फेकीवर धावचित केले आणि मुंबईचा डावही १५३ वर रोखीत सामना ‘टाय’ बनविला. ‘सुपर ओव्हर’मध्ये मात्र जसप्रित बूमराहने भेदक गोलंदाजीत १ बाद ११ धावांच्या पाठलागातील गुजरात लायन्सला ६ धावांवर रोखीत मुंबई इंडियन्सला विजयाचे दोन गुण मिळवून दिले.
३० एप्रिल २०१९ : नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स वि. वि. कोलकाता नाइटरायडर्स : आंद्रे रसेलच्या तडाखेबंद ६२ धावांवर कोलकाता नाइटरायडर्सने युवा दमाच्या दिल्ली कॅपिटल्सपुढे ८ बाद १८५ धावांचे तगडे आव्हान खडे केले. प्रत्युत्तरात पार्थिव पटेलच्या तुफानी ९९ धावांवर दिल्ली कॅपिटल्सने दमदार आगेकूच केली, पण अंतिम क्षणात हा संवेग राखता आला नाही आणि ६ बाद १८५ पर्यंतच मजल गाठता आली. तथापि, ‘सुपर ओव्हर’मधील कॅगिसो रबादाच्या भेदक ‘यॉर्कर’पुढे केकेआरला ११ धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले आणि ३ धावांच्या पराभवासह आयपीएलच्या ‘सुपर ओव्हर’ इतिहासातील तिसरा पराभव पत्करावा लागला.
२ मे २०१९ : मुंबई : मुंबई इंडियन्स वि. वि. सनरायझर्स हैदराबाद : मुंबई इंडियन्सच्या ५ बाद १६२ धावांच्या पाठलागातील सनरायझर्सच्या मनिष पांडेने हार्दिक पांडेच्या शेवटच्या चेंडूवर षटकात खेचीत ६ बाद १६२ अशा बरोबरीसह सामना ‘सुपर ओव्हर’मध्ये नेला. तथापि, जसप्रित बूमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे सनरायझर्सला ‘सुपर ओव्हर’मध्ये केवळ ८ धावाच जमविता आल्या आणि प्रत्युत्तरात हार्दिक पांड्याने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला आणि नंतर मुंबईने आरामात ‘सुपर ओव्हर’ जिंकली.
२० सप्टेंबर २०२० : दुबई : दिल्ली कॅपिटल्स वि. वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : विद्यमान इंडियन प्रिमियर लीगमधील पहिल्या ‘सुपर ओव्हर’ मुकाबल्यात मार्कुस स्टॉयनिसच्या शानदार अष्टपैलू कामगिरीनंतर कॅगिसो रबादा पुन्हा एकदा ‘किंग ऑफ सुपर ओव्हर’ ठरला. मार्कुसच्या २१ चेंडूंवरील तडाखेबंद ५३ धावांच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ८ बाद १५७ धावांचे आव्हान खडे केले आणि अखेरीस अंतिम षटकात मयंक अगरवाल (८९) आणि जॉर्डन यांचे मतत्त्वपूर्ण बळी घेत किंग्ज इलेव्हनला १५७ वर रोखीत सामना ‘टाय’ बनविला. ‘सुपर ओव्हर’मध्ये कॅगिसो रबादाने भेदक गोलंदाजीत पंजाबचा कर्णधार के. एल. राहुल आणि निकोलस पुरनला स्वस्तात बाद करीत केवळ ३ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात मोहम्मद शामीचा दुसरा चेंडू वाइड आणि तिसर्यावर ऋषभ पंतने दुहेरी घेत दिल्ली कॅपिटल्सचा विजय झळकविला.
२८ सप्टेंबर २०२० : दुबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. वि. मुंबई इंडियन्स : सलामीवीर देवदत्त पडिकल (५४), ऍरोन फिन्च (५२), ए. बी. डिविलियर्स (नाबाद ५५) आणि शिवम दुबे (नाबाद २७) यांच्या तडाखेबंद फलंदाजीवर प्रथम फलंदाजीस पाचारण केलेल्या रॉयल चॅलेंजर्सने प्रतिस्पर्ध्यांपुढे २०२ धावांचे तगडे आव्हान खडे केले. प्रत्युत्तरात कर्णधार रोहित शर्मा (८), क्विंटन डी कॉक (१४), सूर्यकुमार यादव (०) आणि हार्दिक पांड्या (१५) स्वस्तात बाद झाल्याने १२ व्या षटकात मुंबईची ४ बाद ७८ अशी नाजूक स्थिती बनली होती. पण इशान आणि पोलार्डने सावध खेळीत एकेरी दुहेरी धाव घेत डाव सावरला. शेवटच्या चार षटकांत तर ८० धावांची गरज होती पण केवळ धावेने शतक हुकलेला इशान किशन (५५ चेंडूत २ चौकार ९ षटकारांसह ९९) आणि किरॉन पोलार्ड (२४ चेंडूत ३ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ६०) यांनी अंतिमक्षणी बेदरकारपणे दांडपट्टा घुमवित केलेल्या धुवांधार फटकेबाजीमुळे मुकाबला रोमांचक ठरला, पण दोन चेंडूत पाच धावांची गरज असताना इशान झेलबाद झाला. अंतिम चेंडूवर पोलार्डने चौकार ठोकीत सामना ‘टाय’ बनविला. इशान किशन आणि पोलार्डने ११९ धावांची भागीही नोंदली. मुंबई इंडियन्स ‘सुपर ओव्हर’ विजयाची हॅट्ट्रिक नोंदणार अशी अपेक्षा होती पण बंगळुरूचा युजा तेज गोलंदाज नवदीप सैनीने प्रभावी गोलंदाजीत मुंबईला ७ धावांवर रोखले आणि अखेर वीराट कोहली आणि ए. बी. डिविलियर्सने आठ धावांचे लक्ष्य आरामात गाठीत रॉयल चॅलेंजर्सला विजयाचे दोन गूण मिळवून दिले.