सुनक सरकार पराभूत

0
26

ब्रिटीश संसदेच्या निवडणुकीत तेथील भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाचा झालेला दणदणीत पराभव आणि मजूर पक्षाची झालेली सरशी एक नवे स्थित्यंतर घेऊन आली आहे. भारत – ब्रिटन संबंधांवरही सुनक यांचा हा पराभव परिणाम करणारा ठरू शकतो. खरे तर सुनक यांच्या सरकारचा कार्यकाळ जानेवारी 2025 पर्यंत होता, परंतु आपले सरकार पुन्हा निवडून येईल ह्या भ्रमात त्यांनी मुदतपूर्व निवडणूक जाहीर करून टाकली होती. खरे तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये ह्या निवडणुका घेतल्या जातील अशी जनतेची अपेक्षा होती, परंतु सुनक यांनी मुदतपूर्व निवडणुका जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला. खुद्द हुजूर पक्षातही त्याबाबत नाराजी होती. ब्रिटनची अर्थव्यवस्था नुकतीच कुठे सावरू लागलेली असताना तिला स्थिर होऊ न देताच निवडणुकांची घाई का करण्यात आली असा प्रश्न अनेक राजकीय निरीक्षक विचारत होते. आपण केलेल्या आर्थिक सुधारणा व महागाईवर मिळवलेले नियंत्रण यामुळे मतदार आपल्या सरकारची फेरनिवड करतील असे सुनक यांना वाटत होते, मात्र, ह्या निवडणुकीत मतदारांनी त्यांनाच हिसका दिला आहे. तब्बल चौदा वर्षांची हुजूर पक्षाची सत्ता मजूर पक्षाने उलथवली आहे आणि भारी बहुमताच्या जोरावर कीर स्टार्मर आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. साडेसहाशे मतदारसंघ असलेल्या ब्रिटीश संसदेमध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तरी आयर्लंडमधून खासदार निवडले जातात. हुजूर आणि मजूर हे तेथील पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्ष, परंतु ह्या निवडणुकीत लिबरल डेमोक्रॅटिक ग्रीन पार्टी, स्कॉटिश नॅशनल पार्टी, एसडीएलपी, डीयूपी, अँटी इमिग्रेशन रिफॉर्म पार्टी आणि अपक्षही मोठ्या प्रमाणावर निवडणुकीत उतरले हेोते, परंतु खरा सामना हुजूर व मजूर पक्षातच झाला आणि हुजूर पक्षाची सत्ता उलथवली गेली. खरे तर सुनक यांच्या हाती पंतप्रधानपदाची सूत्रे राजकीय वादळाअंती आली होती. लीझ ट्रस यांना पंचेचाळीस दिवसांतच राजीनामा द्यावा लागला होता आणि सुनक पंतप्रधान बनले होते. आपल्या वैयक्तिक करिष्म्याच्या जोरावर ते लोकप्रियता मिळवतील अशी अपेक्षा होती, परंतु ब्रिटनच्या जनतेने वेगळा कौल दिला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुसंख्य मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला आहे. लोकांना बदल हवा आहे हे निकालातून स्पष्ट दिसते आहे. ब्रिटनला त्याचे भविष्य परत मिळाले आहे अशा शब्दांत कीर स्टार्मर यांनी आपल्या पक्षाच्या विजयाचे वर्णन केले आहे. स्वतः मजूराचे पुत्र असलेले स्टार्मर मानवाधिकारांसाठी लढणारे वकील ते राजकारणी असा प्रवास करून खासदार बनल्यापासून नऊ वर्षांतच पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्याकडे वैयक्तिक करिष्मा नाही, त्यांच्या भूमिका सतत बदलत राहिल्या आहेत वगैरे टीका त्यांच्यावर होत होती, परंतु मतदारांना हुजूर पक्षाची सत्ता उलथवायचीच होती असे दिसते. भारत – ब्रिटन संबंध सुधारण्याची घोषणा मजूर पक्षाने केली आहे आणि ब्रिटनच्या लोकसंख्येच्या तीन टक्के असलेल्या, परंतु तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्नात सहा टक्के वाटा असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना जवळ करण्याच्या दिशेने मजूर पक्षाने निवडणुकीपूर्वीपासून प्रयत्न चालवला होता. विशेषतः ब्रिटनमधील हिंदूविरोधी वर्णद्वेषी घटनांना आपल्या राजवटीत थारा मिळणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. भारताशी मुक्त व्यापार करार करण्याचे व तंत्रज्ञान, शिक्षण, सुरक्षा व हवामानविषयात परस्पर सहकार्याचे अभिवचनही पक्षाने दिलेले आहे. ब्रिटनमध्ये भारतीयांची संख्या व प्रभाव लक्षणीय आहे. संसदेच्या निवडणुकीलाच यंदा भारतीय वंशाचे जवळजवळ एकशे सात उमेदवार उभे होते. आपल्या गोव्याच्या सुएला ब्रेव्हरमनसह अनेक भारतीय वंशाच्या नेत्यांची खासदारपदी निवडही झालेली आहे. काश्मीर प्रश्नावर मजूर पक्षाची भूमिका पूर्वी वादग्रस्त ठरली होती, परंतु आता थेम्सवरील पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. हुजूर पक्षाला ब्रेक्सिटनंतर ब्रिटनची अर्थव्यवस्था नीट सावरता आली नाही, कोवीडच्या काळात गैरव्यवस्थापन झाले, आरोग्यव्यवस्था कोलमडली त्याचाही त्यांना फटका बसला, महागाई अकरा टक्क्यांवर पोहोचली तेही जनतेला मानवले नाही अशी कारणे आता सुनक यांच्या पराभवासाठी दिली जात आहेत. सरकार आता बदलेल, परंतु प्रश्न आहे तो ही अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणून मजूर पक्ष जगाशी ब्रिटनचे संबंध पुन्हा सुरळीत करू शकेल का. कीर स्टार्मर हे गॉर्डन ब्राऊननंतर पंतप्रधानपदी येणारे ब्रिटनचे मजूर पक्षाचे पहिले नेते ठरतील. राजकारणातून जनसेवेकडे नेण्याचे वचन त्यांनी जनतेला दिलेले आहे. येणाऱ्या काळात ते सरकार कसे चालवतात, ब्रिटनमधील बहुवंशीय जनतेचा विश्वास कसा कमावतात, इमिग्रेशन, नागरिकत्व, वर्णद्वेषाच्या घटना यासारख्या वादग्रस्त विषयांना कसे सामोरे जातात हे पाहावे लागेल. ब्रिटनला त्याचे भविष्य खरेच परत मिळाले आहे का हे येणारा काळच सांगेल.