कुटुंबियांकडून सीबीआय चौकशीची मागणी
अखेर माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी आपली पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूच्या अनुषंगाने आजवरचे आपले मौन काल सोडले. या प्रकरणाची चौकशी करणार्या पोलिसांना आपण नेहमी सहकार्य केले असून आपण सध्या सुनंदाच्या मृत्यूच्या अहवालाची प्रतीक्षा करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.सुनंदा यांची शवचिकित्सा केलेल्या तीन डॉक्टरांच्या पथकाने आपल्या नव्या अहवालात त्यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे जाहीर केल्यानंतर थरूर यांनी याप्रकरणी वरील वक्तव्य केले आहे. ‘मी पोलिसांना पहिल्या दिवसापासून सहकार्य केले आहे. सुनंदाच्या मृत्यूचा अहवाल मी मागवला आहे. पोलिसांकडून मला काहीच समजलेले नाही’ असे थरूर यांनी पत्रकारांना सांगितले.
आपल्याला या प्रकरणी काहीच दडवून ठेवायचे नाही. आधीही आपण हेच सांगत आलो आहे असे ते म्हणाले. या प्रकरणी कॉंग्रेसने शुक्रवारी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसेच भाजप या विषयाचे राजकारण करीत असल्याचेही कॉंग्रेसने म्हटले होते. कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले की याप्रकरणी कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जेव्हा कायदेशीर प्रक्रिया चालू असते तेव्हा प्रत्येक कागदपत्राविषयी कोणी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची गरज नाही. जेव्हा हे प्रकरण अंतिम निर्णयाप्रत येईल त्यावेळी आम्ही पाहू असे सिंघवी यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी या प्रकरणी नव्याने चौकशीची मागणी केल्याबाबत विचारले असता भाजप या विषयाचे राजकारण करू पाहत असल्याचे ते म्हणाले.
सीबीआय चौकशीची मागणी
दरम्यान, सुनंदा पुष्कर यांच्या कुटुंबियांना या संशयास्पद प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुनंदा यांचे चुलत बंधू अशोक कुमार यांनी हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. सुनंदा यांचे बंधू आशिष दास यांनीही सत्य उजेडात यायला हवे असे म्हटले आहे.