राज्यातील युवा वर्गाला उद्योजकतेकडे वळविण्यासाठी विशेष प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच ‘मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजने’मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘सुधारित मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजने’च्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना काल केले.
या योजनेखाली व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या युवकाला आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. तसेच, महिला उद्योजकांसाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यातील नागरिक पूर्वीच्या काळात पारंपरिक व इतर व्यवसायात कार्यरत होते. गोव्यातील नागरिकांचा उद्योग व व्यवसाय हा डीएनए होता. कालांतराने गोव्यातील पारंपरिक उद्योग व व्यवसायात घट झाल्याने आम्हांला विविध गोष्टीसाठी परराज्यांवर अवलंबून राहावे लागत आहे, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
राज्यात विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी भरपूर वाव आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी केवळ खासगी किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतात. उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उद्योजकतेबाबत मार्गदर्शन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
महाविद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. महाविद्यालय पातळीवर उद्योग, व्यवसाय करण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी एंट्रेप्रेनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (ईडीआयआय) या संस्थेकडून सहकार्य लाभत आहे. युवा वर्गाला ईडीसीच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी ईडीसीचे व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र आंगले उपस्थित होते.

