सुतापुनव : एक सांस्कृतिक धारणा!

0
356

– विनायक विष्णू खेडेकर
श्रावण पौर्णिमा. गोमंतकीय जनजीवनातलं नाव ‘सुतापुनव.’ नव्हे, पुनव कोंकणी नव्हे. लक्षात घेऊया एक नाट्यगीत- ‘उगवला चंद्र पुनवेचा.’ गोव्यातल्या तमामांना सुतापुनव म्हणून ठाऊक असलेला हा दिवस.
पावसाळ्यात बंद असलेली मासेमारी नारळी पौर्णिमेला- म्हणजे याच दिवशी- समुद्राला नारळ अर्पण करून सुरू होते. त्याचं खवळलेपण कमी झाल्यानंतर पाण्यात होड्या सोडायच्या, त्या मच्छीमार बांधवांसाठी ही नारळी पौर्णिमा. याच दिवसाला आणखी एक नाव आहे- श्रावणी वा श्रावणी पौर्णिमा. श्रावणी हा एक वेगळा विधी. बहुधा वाड्यावरील ब्राह्मण कुटुंबातील पुरुष मंडळी एकत्र येऊन समंत्रक सूत धारण करण्याचा म्हणजेच जानवे घालण्याचा विधी. ती श्रावणी, आचार्य अत्र्यांनी ज्याची खिल्ली उडवली, तो. पंचगव्य प्राशनाचा महत्त्वपूर्ण विधी असलेला आणि सोबतच सातूचं म्हणजे सवादधान्याच्या पिठाचे गोळे दह्यात बुडवून खाण्याचा दिवस.
भारतीय संस्कृती. नदीचा खळाळता प्रवाह. हे खळाळलेपण पाहण्यासाठी हिमालय परिसरातच जायला हवं. कोणतीही नदी एका ठिकाणी उगम पावते आणि प्रवाहित होते. त्यावेळी आजूबाजूचे अनेक जलस्रोत आपले अस्तित्व त्या प्रवाहात संपवतात. त्या पाण्याशी, त्या जलधारेशी एकरूप होतात. छोट्या-मोठ्या नद्या, नाले, झरे अशा विविधांगांनी हा मूळ प्रवाह प्रभावित होतो. तसाच, जोमदारपणे प्रवाहित होतो. समधर्मी पाण्याच्या अशा विलीनीकरणानं नदीचा मूळ प्रवाह तुष्ट होतो आणि पुष्टही होतो. अशा श्रमश्रोत पाण्यानं घडतं त्याहून विलक्षण घडू लागतं ज्यावेळी रसायनमिश्रित गढूळ, घातक द्रव्यांचा समावेश असलेलं पाणी त्यात मिसळतं. गरज आहे ती हा प्रवाह शुद्ध ठेवण्याची, प्रदूषित पाण्यापासून मूळ प्रवाह स्वतंत्र राखण्याची.
संस्कृतीच्या या प्रवाहात आहेत वर्षभर चालणारे अनेक सणपरब. यांचं महत्त्व, वास्तविक विविध वर्ग-वर्णांकरिता निरनिराळ्या रूपांत दिसून येतं. अशा काही सणपरबेसाठी पुनवेचा दिवस अधिक उत्साहानं पाळला जातो.
आदिवासी जीवनमनाला, त्यांच्या अनाघात भावविश्‍वाला निसर्गाचं खूपच कौतुक. एक दाणा पेरताच त्यातून अनेक दाणे निर्माण होतात. हा विषयच कुतूहलाचा. त्याचबरोबर कलेकलेने वृद्धिंगत होत जाणारा. चंद्र पुनवेला आकाशात पूर्ण प्रतिमेनं प्रकाशतो आणि दुसर्‍या दिवसापासून क्षीण होत जातो. हा विस्मयकारक प्रकार भारतीय जनमानसाला एका वेगळ्या विश्‍वात नेऊन ठेवणारा. त्यामुळं अशा पुनवेला सण असावा ही त्या समूहमनाच्या भावविश्‍वाची अभिव्यक्ती असं म्हणता येतं.
गोमंतकीयांपुरतं, पुनवेचं महत्त्व विविध सामाजिक स्तरांवर. अनेकविध प्रकारांनी समृद्ध केलेलं. बारा महिन्यांचा विचार करायचा तर चैत्री, माघी आणि आश्‍विनातील कोजागिरी अशा तीन पुनवा उच्च व मध्यमवर्गीयांसाठी. चैत्रीचा मोठा उत्सव साखळीला होतो. माघपुनवेला अनेक मंदिरांतून रथोत्सव होतात आणि कोजागिरी पौर्णिमा ही द्यूताची. म्हणजे आपली जुगारपुनव.
केवळ मध्यमवर्गीय पुनव पहिली वैशाखात. ही वसंतपूजेची. म्हणजे उसळ्या खाण्याची. दुसरी ज्येष्ठातली. आपली वडापाव. सातजन्म तोच पती मागण्याचा हट्ट केवळ मध्यमवर्गीय बायकाच धरू शकतात. त्यातही भटा-ब्राह्मणांच्या. तिसरी कार्तिकी पुनव. ही दीपोत्सव वा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून पाळली जाणारी. पण अनेक सामान्यांत, काही ठिकाणी कुळमी, कुळवाडी अशा जमातींत ‘कातयो’ नावाचा वेगळा सण साजरा केला जातो तो याच दिवशी.

इथं पावसासाठीच्या कृत्तिकापुंजासह इतर नक्षत्रं चंद्र, सूर्य अशा केवळ आकाशस्थ दैवत प्रतिनिधींसाठी नृत्य-गायनादी विधी होतात.
गोव्यातील आदिवासी जमातीत, बहुधा केवळ याच समाजात वर्षातील दोनच पुनवांचं अतिशय महत्त्व. पहिली आसाडी पुनव. हा पवित्र दिन म्हणून अनेक चांगल्या कामांची सुरुवात या दिवशी होते. करमल वृक्षाची पाने प्रथमतः याच दिवशी घरात आणायची. ऐन पावसाळ्याच्या भरात येणारी ही पुनव. या दिवशी बहरात असलेल्या शेतीभातीच्या कामांपासून पूर्णतः मोकळीक घेऊन गोडाधोडाचं खाऊन हा सण साजरा करायचा. काल-परवापर्यंत अनेक ठिकाणी आसाड पुनवेला जमीन खणायची नाही वा झाड लावायचं नाही असे संकेत होते वा आहेत. या जमातीची दुसरी, ही मालशे पुनव. पौष महिन्यातली. या दिवशी शेतीच्या कामापासून मौसमी मोकळीक मिळालेली. खरं तर या जमातीचा शिगमा मालशे पुनवेला सुरुवात होतो. गुडुल्यागाणी हा लोकमहाभारत गायनाचा विधी इथून जवळ जवळ दोन महिने बंद ठेवायचा. या दिवशी गुडुल्याला घड्यावर ठेवलं असं तो म्हणतो.
शिगम्यातील होळी पौर्णिमा. तशी सर्वांसाठी होळी रे होळी, पुरणाची पोळी. महाराष्ट्राला शेजारी म्हणून ठेवलेल्या पेडण्यातच. कुळमी, गावड्यात होळीच्या सणाचं तसं फारसं स्वागत नसतं. इतर अनेक जमातींत मात्र हा परबेचा दिवस. होळी पुरण्याचा आणि गडे पाडण्याचा. म्हणतात अशिष्ट, अश्‍लील, अभद्रही बोलण्याचा. पण तो ठरावीक ठिकाणी, ठरावीक लोकांतच. का कोण जाणे, पण गोव्यातल्या एकूणच समाजव्यवस्थेत मार्गशीर्ष पुनवेला कोणतंही स्थान नाही.
या सर्वांत अग्रभागी असलेली, संपूर्ण गोव्यात सणाचं महत्त्व पावलेली, समाजाच्या एकूण एक स्तरांमध्ये प्रचलित असलेली ती सुतापुनव. नेहमीच वेगळे असलेले उच्च वर्गवर्णीय सोडून सर्व जनजातींसाठी. ही परब साजरी करण्याच्या पद्धती अनेकविध, वेगवेगळ्या प्रकारच्या असल्या तरी सूत धारण करणं ही संकल्पना सर्वत्र कायम आहे. जानवे धारण करणारे भटबामण याच दिवशी नवीन- हो याला यज्ञोपवीत म्हणायचं- धारण करतात. बाकी बहुतेक सर्व जमातींत जानव्यासारखेच सुतापोड गळ्यात घालणे आहे. अलीकडे हे जानवंच पण घरगुती. बाजारात कधी प्लास्टिक पिशवीत मिळतं. कधी ते गावच्या भटाकडून आणायचं तर कुठं प्रत्येक गावात जानवी तयार करणारा एखाद दुसरा असतोच त्याच्याकडून. गोव्याबाहेरूनही जानवी येतात या दिवसांत. एक वेगळी गोष्ट. अशा जानव्यांसाठी टकली-गोव्यात चाती वापरून कापसापासून सूत काढले जायचे व त्याचीच फक्त जानवी बनवायची. अजून थोड्या ठिकाणी चालते. पण भटाबामणात.
काणकोणातील गावडोंगरीत सुतापुनवेला एक वेगळीच प्रथा पाहायला मिळाली. तेथील मलकाजाण मंदिरात गुरव होता. पुराणकालापासून अगदी अलीकडेपर्यंत. ती जागा आता ब्राह्मणानं घेतली. रीतीरिवाज कायम राहिले. गुरव करत होता ते काम आता हा भटजी करतो. त्यानुसार सुतापुनव येण्याअगोदर शेकडो जानवी त्याला तयार करावी लागतात. पुनवेच्या पहिल्या दिवशी कुळमी जमातीतील वेळीप व गावकर अशा सर्व घरांतून त्याने फिरायचं आणि घरातील पुरुषमाणसांच्या संख्येनुसार जानवी द्यायची. घरांतून प्रत्येक जानव्याला एक पड या मापानं बहुधा तांदूळ गुरव-भटाला दिले जातात. आताशा गावातील बुदवंत वा राजकीय गटप्रमुखाकडे जानवे देऊन तो परततो.
सुतापुनव साजरी करायची म्हणजे सकाळी छान आंघोळ. ओलेत्यानंच कपाळाला, हातांना गंध लावायचं. कुळमी याला गंदउटी म्हणतो. त्यानंतर घरातील घरवय वा काही देवतास्थान असलं तर तिथं जाऊन नवीन जानवं गळ्यात घालायचं. पागोळीच्या बाहेर येऊन तुळशीला पाणी व फूल व सूर्याच्या दिशेनं एक लाल फूल उडवायचं आणि पाणी सोडायचं. दुपारी गोडाधोडाचं जेवण. सामान्यांसाठी. सुतापुनवेचा मुख्य विधी एवढाच.
धर्म हा व्यक्तीचा, फार तर कुटुंबाचा असतो. पण संस्कृती ही त्या मातीतून अस्तित्वात आलेली तेथील समूहाची असते. याचं प्रत्यंतर देणारी वस्तुस्थिती नोंद करायलाच हवी. काल १९५५ ते १९७० अशी पंधरा वर्षे. गाव मडगावनजीकचं फातोर्डा, आर्ले. इकडचं कायसुवा, वेर्णा आणि केपे भागातील काही. बहुतेक ठिकाणी ख्रिश्‍चन गावड्यांची वस्ती. येथील जाणते पुरुष सुतापुनवेच्या दिवशी अशी जानवी मिळवायचे. कधी नुसतंच सूत. दुकानदाराकडून पुडे बांधून आलेलं. हे जानवं वा सूत उजव्या हाताला गुंडाळायचं आणि दुपारी मांसमच्छी खायची नाही. ही त्यांची सुतापुनव.
सुताचं सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेण्याजोगं. अनेक जमातींत जन्मानंतर तिसर्‍या महिन्यातील एखाद्या पुनवेच्याच दिवशी त्या अर्भकाच्या कंबरेत सुताचा बनविलेला गोफसारखा प्रकार बांधला जातो. लग्नविधीत बांबूच्या मारवतापासून ते दाते अथवा मुसळापर्यंत सर्वच वस्तूंना सूत बांधायचं व त्याला आंब्याचं पान लावायचं अशी प्रथा आहे. कुठून आलं माहीत नाही. पण भटजी देवक ठेवताना करीत असलेल्या शास्त्रीय विधीत सुताचा वापर करतो. यावेळी रुमडाच्या समिधेला बाहेरून आंब्याचं पान सुतानं बांधायचं व अशा त्या सप्तमातृका म्हणून देवकसोबत पुजायच्या. धार्मिक विधीत सूत्रवेष्टन हा प्रकार आहे. वर, वधू दोघांनाही समोरासमोर मानेकडे व कमरेकडे सुताचे तीन-तीन वेढे घ्यायचे. दोन्ही ठिकाणचं सूत वेगवेगळं एकत्र करून त्याची दोन कंकणं करायची, हातात बांधण्यासाठी वधूवरांच्या. याला हळद बांधायची. धार्मिक व इतर अनेक चालीरीतींत या सुताला भारतीय सांस्कृतिक जीवनात एक वेगळे स्थान आहे. एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्या नाकाशी सूत धरणं ही प्रथा म्हणूनच पाळली जाते.
गोव्यात अलीकडेच माध्यमांच्या माध्यमातून आलेला सूत बांधण्याचाच प्रकार म्हणजे रक्षाबंधन. राखीपौर्णिमा हे याचं उत्तरेकडचं नाव. पण ही राखी आली, फैलावली आणि गोव्याची होऊन बसली. उत्तरेत अनेक ठिकाणी भावाबरोबरच गावातील जमीनदाराला राखी बांधतात. त्यानं रक्षण करावं म्हणून. अजूनही समजलं ते असं की आपला नवरा, कचेरीतील बॉस यांसकट गावातील दादालोकांनाही राखी बांधण्याचा प्रकार अनेक ठिकाणी आहे. तो पुरुषानं आपलं संरक्षण करावं एवढ्यासाठीच. सुतापुनव असो वा श्रावणी, नारळी वा राखी, हे सारेच रीतीरिवाज भारतीय संस्कृतीतील आणि इथल्या मातीच्या परंपरेतील आहेत. त्यामुळं भारतातल्या कुठल्याही प्रदेशात त्यांचं आगमन स्वीकारार्ह असतं, असावं. कारण आपल्या एकूणच सणपरबेमागची संकल्पना ही एक तर निसर्गसंवादी आहे आणि पूर्णतः भारतीय आहे. कारण सूत हा राखीतीलही प्रमुख धागा आहे. पाश्‍चिमात्यांना या मागचं तत्त्वज्ञान समजून घ्यावं लागेल. अलीकडचे वेलंटाइन वा फ्रँडशिप डे. यात नाही म्हटलं तरी थोडा वेगळ्या प्रकृतीचा संबंध आहे, जो संस्कृतीला परिचित नाही.
या निमित्तानं एक प्रश्‍न निर्माण होतो, आपल्या सगळ्याच सणपरबांचं व्यापारीकरण होत चाललेलं आहे का? कारण यातूनच ग्लोबलायझेशन ही संकल्पना रुजू लागते आणि प्रादेशिकता, मातीचे गुणधर्म, निसर्गसंवादित्व याला कोणताही अर्थ राहत नाही. आपल्याकडे नागपंचमीला पूजेसाठी नाग घरात तयार केले जायचे. अर्थात फारच थोड्या घरांतून ही पूजा परंपरेनं चालत होती. पण नागांच्या प्रतिमा बाजारात विकत मिळायला लागल्या. आमच्याकडे का नसावी म्हणून अनेक कुटुंबांतून नागपूजा सुरू झाली. कुठं प्रत्यक्ष नागोबाला दूध दिलं जाऊ लागलं. इलेक्ट्रॉनिक वा इतर माध्यमांच्या कृपाशीर्वादानं गोव्याच्या सांस्कृतिक जीवनात पडू लागलेली भर थोडक्यात-
१. गोव्यात होळीला लाकडं जाळली जात नाहीत. होळीच्या मुळाशी थोडं गवत टाकून प्रातिनिधिक होलिकादहन होतं.
२. ‘चल ग सये वारुळाला, नागोबाला पुजायला’ गोव्यात नाही.
३. वडाला सूत गुंडाळण्याची प्रथा गोव्यातली नव्हे.
४. राखीबंधन गोव्याबाहेरून आलेलं.
५. नारळीपौर्णिमेला कोळी म्हणजे गोव्यातील खारवी बांधवांकडे नाच-गाणे नाही.
६. नवरात्रातला दांडिया नाही.
हे सारं नसण्याचं वा असण्याचं कारण प्रादेशिकता हे आहे. परंतु त्यातही सांस्कृतिक जीवनपद्धतीला अभिप्रेत असलेलं, या मातीला परकं वाटू नये अशा प्रकारचं आलं, ते गोमंतकीयांनी स्वीकारलं. आपलंसं केलं. मूळ ग्रीक संस्कृतीतले रविवार, सोमवार हे सात वार आपल्या धर्म व संस्कृतीनं खाऊन पचवून टाकले तद्वत.
कारण भारतीय संस्कृती ही एक धारणात्मक संकल्पना आहे. ती सहिष्णू आहे, आणि म्हणून वर्धिष्णू आहे. लोकसरितेचा खळाळता प्रवाह विविधसंवादी प्रकृती-प्रवृत्तींना सामावून घेत वाहतच राहणार आहे.
आजही जगाच्या नकाशावर भारतीय संस्कृतीचा उदोउदो करणारे अनेक विचारवंत, बुद्धिमंत, धीमंत, श्री-मंत सर्वत्र पसरलेले आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातली देशवासीयांची कामगिरी स्वामी विवेकानंदांनी पोचवलीच, पण त्याअगोदर गणित, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, व्याकरण अशा अनेक क्षेत्रांत भारताची ध्वजा सर्वत्र फडकविण्याचं काम भास्कराचार्य, वराहमिहिर सुश्रुत, पाणिनी, आर्यभट्ट, वैद्यक आणि सोबतच कविकुलगुरू कालिदास यांनीही केलेले आहे.
दुर्लभम् भारते जन्म किंवा भारतीयत्र संस्कृती सांगणार्‍या ऋषिमुनींचंच सूत्र पुढं नेलं गेलं. हिंदुत्ववादी म्हणून हिणवल्या गेलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उच्च रवानं सांगितलं-
‘आ सिंधु सिंधु पर्यंता
यस्य भारत भूमिका
पितृभूः पुण्यभूश्‍चैव
सवै हिंदू रितिस्मृतः’
हिंदू हा धर्म नसून धारणा असल्याचं प्रतिपादन अनेकांनी केलेलं आहे. ही धारणा, यालाच संस्कृती म्हणता येतं. वर्णन केलेले सणपरब म्हणजे या संस्कृतीचं समूर्त रूप आहे. ही लोकसरिता प्रदूषित करण्याचे प्रयास अनेकजण करत आहेत. भारतीय गंध घेऊन उमलत जाणारं हे संस्कृतिपुष्प एका बाजूला आहे तर दुसर्‍या बाजूला सेक्युलरिझमनं तुष्ट बनवलेला आणि व्यापारी कारणातून पुष्ट होत चाललेला पब-बिकिनीचा टोकदार काटा खुपत आहे. अशा परिस्थितीत आपण याला फुलासारखं फुलू द्यायचं का काट्याचा नायटा होईपर्यंत सलू द्यायचं? तुम्हीच ठरवा!