- कु. आकांक्षा अनंत नाईक, कासारवर्णे पेडणे
आमच्या हेमाचं लग्न होतं. आता मैत्रिणीचं लग्न म्हटल्यावर कपडे, चप्पल व इतर खरेदी करायची म्हणजे वेळ तर हवाच. त्यात मी मुलगी… आम्हाला एखादी गोष्ट घ्यायचीय तर किती तास दुकानात जातात याचा अंदाज करता येणार नाही.
त्या दिवसाची गोष्ट, मी कपडे खरेदी करण्यास म्हापसा येथे गेले होते. कपडे घेता-घेता संध्याकाळ झाली. कधी 7.30 वाजले कळलेच नाही. मनगटावर लक्ष जाताच घाईगडबडीने बाजारातून बसस्टॅण्डवर आले तर वाळपईला जाणारी एकही बस नव्हती. दिवस रविवारचा होता अन् मला साखळी-नावेलीला जायचे होते म्हणून मी चिंतेत होते. तोच मला पणजीला जाणारी बस दिसली. मी मागचा-पुढचा विचार न करता निदान पणजीहून माशेल-साखळी जाणारी तरी बस मिळेल या आशेने बसमध्ये चढले.
बसमध्ये बरीच गर्दी होती. कसबसा पिशवीमधून फोन बाहेर काढला तर आईचे सहा मिसकॉल होते. आईला लागलीच फोन केला. ती फार घाबरली होती.
“बाय, अशें किदे गो, कितलो उशीर केलो?”
“सॉरी मम्मी, बाजार करताना लेट जालें… कळलेच ना!”
“आता घरा कशें येतले तू?”
“पळयता बस मेळटा काय पणजीच्यान.. तू काय भियो नाका,” असे म्हणत मी फोन ठेवला. मनात बस मिळेल की नाही याची धाकधूक होतीच. कधी एकदा पणजी पोचते अन् बस पकडते असे मला झाले होते. मांडवी पूल ओलांडून बस पणजीच्या बसस्टॅण्डवर पोचली. धावत-पळत मार्शेल-साखळीला जाणाऱ्या बसेस जिथे थांबतात तिथे गेले तर तिथे एकही बस नव्हती. खांद्याला लावलेली बॅग खूप जड होती. दोन्ही हातांतील पिशव्या सांभाळत कंट्रोलरुमवर चौकशी केली तर त्यांच्याकडून समजले की आत्ताच एक बस गेली! ‘अरे देवा’ म्हणत मी तोंड पाडत तिथेच उभी राहिले. घरून फोन कॉलचा वर्षाव होत होता. त्यात पावसानेही अचानक हजेरी लावली. मला आता काय करावे काहीच सुचत नव्हते. घरातूनही कोणी न्यायला येण्याची शक्यता नव्हती. एव्हाना रात्रीचे 8.15 वाजले होते. सगळे येणारे-जाणारे माझ्याकडे बघत होते. बसस्टँडवर यावेळी लोकांची वर्दळ खूपच कमी होती. मी देवाचा धावा केला तोच काही वेळानंतर बस आली. बहुतेक ती शेवटची बस असावी. मी बसमध्ये चढले अन् सुटकेचा श्वास सोडला.
माझा पणजी-नावेली बसप्रवास सुरू झाला. फार उशीर झाल्यामुळे बसमध्ये अवघीच माणसे होती. बस कंडक्टरने माझ्या हातावर तिकीट ठेवले आणि तो आपल्या सीटवर जाऊन बसला. मी एकटीच माझ्या सीटवर बसून होते. नाना विचार डोक्यात पिंगा घालत असतानाच बस जुन्या गोव्याला पोचली. तोच दोन दारुडे बसमध्ये चढले. दारू पिऊन ते चांगलेच तर्रर्र होते. त्यातील एक दारुडा माझ्याशेजारी येऊन बसला. तो सारखा मलाच बघत होता. त्याला असं बघताना पाहून मी पार घाबरून गेले. तोच तिथे बस कंडक्टर आला. त्यानं त्याचं तिकीट घेतलं अन् त्याला दुसऱ्या सीटवर जाऊन बसण्यास सांगितले. तो गेल्यावर कंडक्टर ‘बाय भियो नाका’ असे म्हणाला आणि मनाची घालमेल थांबली. मी एका सुरक्षित जागेवर असल्याची खात्री पटली. अर्ध्या तासात मी नावेलीला पोचले. मामा बसस्टॅण्डवर माझीच वाट पाहत उभा होता. बसमधून उतरले आणि सर्वप्रथम मी आईला फोन लावून सुखरूप पोचल्याचे सांगितले.
मी घरी पोचले, पण घडलेला प्रसंग डोक्यातून जात नव्हता. त्या दिवशी कदाचित कंडक्टर काका नसते तर? कदंबा बस नसती तर? पण खरंच मित्र हो, कदंबा बससेवा नेहमी आपल्यासाठी हजर असते. कदंबा बसमधून प्रवास करणे म्हणजे सुरक्षेची खात्री असते. बस कंडक्टरची नजर चौफेर असते. एखाद्या वेळी एखाद्या प्रवाशाची तब्येत बिघडली तर हेच कर्मचारी त्यांना हॉस्पिटलमध्ये पोचवतात. एखादी वस्तू चुकून जर कुणी बसमध्ये विसरला तर ती वस्तू कुणाची हे शोधून ते मालकापर्यंत पोचवतात, याचाही प्रत्यय मला अनेकवेळा आला. कदंबा कर्मचारी कधी-कधी दूरच्या प्रवासाला- म्हैसूर, गुलबर्ग, हुबळी आदी ठिकाणी बस घेऊन जातात. घरापासून दूर त्यांना दोन दिवस राहावे लागते. कधी-कधी तर रात्रीच्या वेळी झोपायची सोय नसेल तर बसमध्येच झोपावे लागते. उन्हाच्या दिवसांत बस तापल्यामुळे रात्री भरपूर गर्मीही सोसावी लागते, तर थंडीच्या दिवसांत थंडीचा त्रास. पावसाच्या दिवसांत गगनबावडासारखा घाट उतरून कदंबा गोव्यात येईपर्यंत घरच्यांचा जिवात जीव नसतो. पावसात घाटात कधी-कधी दरड कोसळते, कधी बसचा ब्रेक निकामी होतो. अशा वेळी बस जंगलातच अडकून पडते. जेवणाचेही वांदे होतात. त्यात पूर्वी कागदाच्या तिकिटी होत्या. कुणी चोरी केली तर त्याचीही भीती. कुणी तिकीटशिवाय तर नाही ना, हेही बघावे लागते. एकदा कॅश डेपोत दिल्यावर ते निवांत होतात. त्याचं नोकरीविषयी असलेलं प्रेम मी जवळून पाहिलं आहे. खरंच, यांच्या कार्याला त्रिवार नमन. तुमचं कार्य असंच चालू ठेवा.