सुक्खूंच्या हाती कमान

0
28

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी सुखविंदरसिंग सुक्खू यांच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीची निवड करून कॉंग्रेसने आपला पक्ष आता घराणेशाहीपासून तळागाळापर्यंत चालल्याचा संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, हे सुक्खू राहुल गांधींचे समर्थक असल्यानेच त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची ही माळ पडली आहे हेही तितकेच खरे आहे. कॉंग्रेस पक्षाने गांधी घराण्याबाहेरील मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाध्यक्षपदी निवड करून वेगळा रस्ता अवलंबल्याचे प्रयत्न जरी केला असला, तरी प्रत्यक्षात सुक्खू यांनी निवडीनंतर गांधी घराण्याचे जे आभार मानले, ते पाहता, त्यांच्या निवडीमागे कोण आहे हे पुरते स्पष्ट झाले आहे. प्रियांका गांधींनी त्यांच्या नावावर मोहोर उठवल्याचे दिसते. खरे पाहता सुक्खू यांना मुख्यमंत्रिपदासाठी पक्षात अनेक प्रतिस्पर्धी होते. त्यातही तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले मंडीचे राजे स्व. वीरभद्रसिंग यांची पत्नी प्रतिभासिंग आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्य हेही या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. त्यामुळेच सुक्खू यांना उद्देशून अमित शहांनी, मुख्यमंत्रिपद तुमच्या वाट्याला येणार नाही. तेथे राजेशाही आणि घराणेशाहीचीच निवड होईल असा टोमणा हाणला होता. अर्थात, त्यामुळेच बहुधा सुक्खू यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला. सुक्खू हे एका सामान्य बसचालकाचे पुत्र आहेत. एकेकाळी त्यांनी सिमल्यात दूधविक्रीही केली आहे. एनएसयूआय, युवा कॉंग्रेस असे एकेक पाऊल टाकत ते कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. चारवेळा ते आमदार म्हणून अगदी भाजपचे दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्याच हमीरपूर जिल्ह्यातून निवडून आले आहेत. धुमल यांचे मोदी सरकारमध्ये मंत्री असलेले चिरंजीव अनुराग ठाकूर यांच्या हमीरपूरमधील पाचपैकी पाचही जागा भाजपने गमावल्या आहेत, हेही येथे उल्लेखनीय आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश नड्डा हेही हिमाचलचे. मात्र, त्यांच्या विलासपूरच्या तिन्ही जागा भाजपने जिंकल्या आहेत. सुक्खू यांच्या निवडीमुळे त्यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांमध्ये असंतोष राहील, हे जाणून मुख्यमंत्रिपदाचे आणखी एक दावेदार मुकेश अग्निहोत्री यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. प्रतिभासिंग कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. हिमाचल प्रदेशच्या जनतेने दर पाच वर्षांनी सत्ताबदल करण्याचा आपला रिवाज कायम राखत यावेळी कॉंग्रेसच्या हाती सत्ता सोपवली, परंतु पुढील पाच वर्षे ती सांभाळण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेसपुढे आहे. त्यातही अशा प्रकारचा पक्षांतर्गत असंतोष असताना. विरोधी पक्षांमधील असंतुष्टांना सहानुभूती दर्शवीत राहून त्यांना अस्वस्थ करून प्रयत्नपूर्वक आपल्याकडे वळवण्याची धूर्त नीती भाजप अवलंबत आला आहे. ज्योतिरादित्य शिंदेंपासून एकनाथ शिंदेंपर्यंतची अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच सुक्खू यांना उद्देशून जो सहानुभूतीपर टोमणा अमित शहांनी हाणला होता, त्याचा रोख लक्षात घेऊन कॉंग्रेसने सुक्खू यांनाच मुख्यमंत्रिपदी बसविण्याचे शहाणपण दाखवले आहे. भाजपला कॉंग्रेसमुक्त भारताचे आपले ध्येय गाठण्यासाठी काहीही करून हिमाचल काबीज करायचे आहे. खरे तर गेल्या निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या मतांची संख्या भाजपला मिळालेल्या मतांपेक्षा किंचित जास्त आहेत. भाजपला या निवडणुकीत हिमाचलमध्ये ४३ टक्के मिळाली आहेत, तर कॉंग्रेसला ४३.९० टक्के. म्हणजे हा फरक एका टक्क्याचाही नाही. पण जागांच्या बाबतीत मात्र भाजपपेक्षा कॉंग्रेस पंधरा जागांनी पुढे गेला आहे. निवडणुकीत सर्वतोपरी प्रयत्न करूनही डाळ न शिजल्याने निवडणुकोत्तर त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास काय करायचे त्याचे बेतही भाजपने आखले होते, परंतु हिमाचल प्रदेशच्या मतदारांनी कॉंग्रेसला ६८ पैकी घसघशीत ४० जागा बहाल करून आणि भाजपला केवळ २५ जागांवर सीमित ठेवून निवडणुकोत्तर सत्तापालटाची शक्यताच मावळून टाकली. खुद्द कॉंग्रेसलाच हे अपेक्षित नव्हते. त्यामुळे आपल्या आमदारांना छत्तीसगढमध्ये सुरक्षितस्थळी हलवण्याची पूर्ण तयारी पक्षाने केली होती. मात्र, जसजशी जागांची संख्या वाढत गेली, तसतशी त्याची गरज नाहीशी होत गेली. आता कॉंग्रेसमधून कोणाला फोडायचे झाले तर दोन तृतीयांशची संख्या लागेल. म्हणजेच किमान सत्तावीस आमदार फोडावे लागतील. हे भाजपसाठी मुळीच सोपे नाही. निसटते बहुमत असते तर कॉंग्रेसच्या काही आमदारांना राजीनामे द्यायला लावून पोटनिवडणुकीत निवडून आणण्याचा प्रयत्न भाजपने निश्‍चित केला असता, परंतु ते येथे साधणारे नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या हाती गेलेली सत्ता मुकाट पाहत राहण्यावाचून आणि कॉंग्रेसमधील अंतर्गत असंतोषाला पडद्याआडून खतपाणी घालत राहण्यावाचून भाजप नेत्यांच्या हाती सध्या तरी काही उरलेले नाही.