सुकतळी – मोलेतील अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

0
3

सुकतळी- मोले येथे गुरुवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार डेव्हीड खतनोलकर (25, सध्या राहणारा आगशी – कुठ्ठाळी, मूळ हलीयाळ – कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत झालेला डेव्हीड हा आगशी येथे चालक म्हणून काम करीत होता. गेल्या मे महिन्यात त्याचे लग्न झाले असून गुरुवारी दुपारी तो दुचाकीने घरी जात होता. कुळे पोलीस सदर अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

डेव्हीड हा आपली केए 65 एच 6278 या दुचाकीने उसगाव येथून मोलेच्या दिशेने जात होता. सुकतळी येथे पोहोचताच मागाहून धावणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक दुचाकीला बसली. त्यावेळी दुचाकीचालक रस्त्यावर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. कुळे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

दरम्यान सदर अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकी रस्त्यावर कोसळल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य एका दुचाकीची धडक रस्त्यावरील दुचाकीला बसली. यात दुचाकी वरील विनसेन्ट परेरा व विजयसिंग देसाई (दोघेही राहणारे पळसकटा- मोले) हे दोन एमआरएफ कंपनीचे कामगार जखमी झाले. जखमीना पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.