सुआरेझच्या गोलमुळे उरुग्वे अंतिम सोळात

0
102

आपल्या कारकिर्दीतल १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या स्टार खेळाडू लुई सुआरेझने पहिल्या सत्रात नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर उरुग्वेने सौदी अरेबियाचा १-० असा निसटता पराभव करीत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘अ’ गटातून अंतिम सोळा संघातील आपले स्थान निश्‍चित केले आहे. उरुग्वेने आपल्या पहिल्या लढतीत इजिप्तवरही १-० अशी निसटती मात केली होती. सलग दुसर्‍या पराभवामुळे सौदी अरेबियाच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा जवळ जवळ संपुष्टात आल्या आहेत.

उरुग्वेने आक्रमक खेळावर भर दिला होता. २३व्या मिनिटाला उरुग्वेने आपले खाते खोलण्यात यश मिळविले. सांचेझने डाव्या विंगेतून घेतलेल्या कॉर्नर किकवर सुआरेझने मिळालेल्या संधीचे सोने करीत चेडूला जाळीची दिशा दाखवित संघाला बाद फेरीचे दरवाजे उघडून दिले. या गोलबरोबर लुई सुआरेझने एक विक्रमही केला. सलग ३ विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा लुई सुआरेझ हा उरुग्वेचा पहिला खेळाडू ठरला. सुआरेझने २०१०, २०१४ आणि २०१८ अशा सलग तीनही फिफा विश्वचषकात गोल केले.

उरुग्वेच्या विजयामुळे अ गटातील बाद फेरीत प्रवेश केलेले दोन्ही संघ निश्‍चित झाले आहेत. पोर्तुगाल आणि यजमान रशियाने आपले पहिले दोन्ही सामने जिंकत बाद फेरी गाठली आहे. त्यामुळे इजिप्त आणि सौदी अरेबियाला गट फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले.