सुंदर साजिरा श्रावण आला…

0
263

– प्रज्ञा फडणीस

भारताला पारतंत्र्याच्या अंधार कोठडीतून मुक्त करून स्वातंत्र्याची पहिली पहाट दाखविणारा १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिनही याच श्रावणातला.
थोडक्यात आनंदाची लयलूट करणारा, भेटीचा आनंद देणारा, मनोकामना पूर्ण करणारा… ‘सुंदर साजिरा श्रावण’!
आपणही त्याची उत्कंठतेने दरवर्षी वाट बघतोच ना!!!

विठू माऊलीच्या भक्तीत ध्यानस्थ झालेला आषाढ संपतो आणि निसर्गचक्रात हळूच प्रवेश करतो तो ‘श्रावण’. चातुर्मासातील हा पवित्र असा महिना भगवान शंकराच्या भक्तीत रमतो. श्रावण येताच ऊन- पावसाचा मजेदार खेळ सुरू होतो. आकाशात इंद्रधनुष्य रंगांची उधळण करू लागतो. सृष्टीचं सौंदर्य पूर्णपणे बहरतं ते श्रावणातच. हिरवीगार झाडं, त्यावर बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरं, जाई, जुई, प्राजक्त, चंपा, चमेलीचा सुंदर दरवळ, हिरवीगार कुरणं आणि त्या हिरव्या कुरणांवर चरणार्‍या पांढर्‍याशुभ्र गायी आणि मंदिरातील घंटेसव येणारा, भक्तीने ओथंबलेला मंजुळ ध्वनी… ‘ॐ नमः शिवाय..’.
संपूर्ण भारतातच हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. पार्वतीने शिवप्राप्तीसाठी या महिन्यात अधिक कठोर तप केले. तेव्हा तो भोळा सांब तिच्यावर प्रसन्न झाला आणि शिव-पार्वतीचा विवाह झाला. तेव्हापासून भगवान शिवशंकराला हा महिना अतिशय प्रिय आहे. या महिन्यात जर महादेवाची आराधना केली तर तो भोळा सांब लवकर प्रसन्न होतो. म्हणूनच श्रावणाची सुरुवात होताच सर्वजण श्रावण सोमवार करतात. आमच्या बालपणी आम्ही सर्वजण या श्रावणाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात असू. रविवारची सुट्टी झाल्यावर सोमवारी शाळेत जायचा कंटाळा यायचा. पण श्रावण सोमवारी शाळा अर्धा दिवसच असायची. मग संध्याकाळी आईबरोबर देवळांत जाऊन महादेवाच्या पिंडीवर बिल्वपत्र वहायची. दूध अर्पण करायचं आणि पुन्हा पुढच्या श्रावण सोमवारची वाट पहायची.
मुलांप्रमाणेच श्रावणाची वाट पाहात असते ती नुकतेच लग्न होऊन सासरी गेलेली नववधू. मंगळागौरीच्या पूजेच्या निमित्ताने माहेरी जायला मिळणार हा आनंद तिच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहू लागतो. बालकवींच्या शब्दांत सांगायचे तर –
‘‘देव दर्शना निघती ललना, हर्ष माईना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत’’
श्रावणात शेतकरी वर्ग मात्र अतिशय व्यस्त असतो. शेताच्या बांधावरून ‘भलरी दादा, भलगडी दादा, भलरी दादा भलं रं’ असे उत्साही सूर ऐकू येतात.
श्रावणातल्या अशाच एका शुक्रवारच्या सोनसकाळी गौरीचे आगमन होते.
‘‘सोन सकाळ झाली, वारा गाणे गाई
आली नटुनी थटुनी हो श्रावणी गौराबाई’’
तिचे मनोभावे पूजन करणार्‍या सुवासिनींना ती भरभरून आशीर्वाद देते तो समृद्धीचा, मांगल्याचा. श्रावणात असेच एकापाठोपाठ एक क्षण येत राहतात. नागपंचमीचा सण, नारळी पौर्णिमेचा सण, रक्षाबंधनाचा सण. हे सण येतात ते आनंदाची उधळण करीतच.
याच श्रावणात भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला ते धर्माचे रक्षण करून अधर्माचा नाश करण्यासाठी!
याच श्रावणाच्या धारांमध्ये मथुरेला जन्माला आलेला श्रीकृष्ण यमुना ओलांडून वसुदेवासमवेत गोकुळी आला.
‘‘गोकुळी आनंद झाला. बाळकृष्ण घरा आला.’’
भारताला पारतंत्र्याच्या अंधार कोठडीतून मुक्त करून स्वातंत्र्याची पहिली पहाट दाखविणारा १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिनही याच श्रावणातला.
थोडक्यात आनंदाची लयलूट करणारा, भेटीचा आनंद देणारा, मनोकामना पूर्ण करणारा… ‘सुंदर साजिरा श्रावण’!
आपणही त्याची उत्कंठतेने दरवर्षी वाट बघतोच ना!!!