२०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय महासचिव तथा गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी काल मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे आमदार, वरिष्ठ पदाधिकारी आणि विविध विभागांच्या प्रमुख भाजप नेत्यांबरोबर वेगवेगळ्या बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील अपेक्षित कामे व लोकप्रतिनिधींची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आमदार व मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.
भाजपच्या पणजी येथील मुख्यालयात झालेल्या या बैठकांमध्ये पक्षाच्या कामकाजाचा, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना व उपक्रमांचा आढावा घेतला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी —‘सेवा पंधरवडा’ व बुथ सशक्तीकरण हा उपक्रम हाती घेतला होता. त्या अंतर्गत पक्षाच्या १५ दिवसांच्या कार्याचा व ज्या राज्यात भाजपचे सरकार आहेत, त्या त्या राज्यांतील सरकारच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल सी. टी. रवी यांनी गोव्यात दाखल होत सदर बैठका घेतल्या.
काल दिवसभरात रवी यांनी पक्षाचे पदाधिकारी, आमदार, मंत्री यांच्यासोबत बैठका घेऊन चर्चा केली. या बैठकीत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. या सर्व बैठकांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे उपस्थित होते.
मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, गोविंद गावडे, रवी नाईक, नीळकंठ हळर्णकर, नीलेश काब्राल हे उपस्थित होते, तर आमदारांबरोबर झालेल्या बैठकीला प्रवीण आर्लेकर, जोशुआ डिसोझा, डिलायला लोबो, मायकल लोबो, केदार नाईक, जेनिफर मोन्सेरात, रुडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, प्रेमेंद्र शेट, दिव्या राणे, संकल्प आमोणकर, दाजी साळकर, आलेक्स सिक्वेरा, दिगंबर कामत, उल्हास तुयेकर, गणेश गावकर व रमेश तवडकर उपस्थित होते. विभाग प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीस माजी खासदार नरेंद्र सावईकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी आमदार दामू नाईक, दयानंद सोपटे, जयेश साळगावकर, महिला मोर्चाच्या अध्यक्ष आरती बांदोडकर आदी उपस्थित होत्या.