सीरियात सत्तापालट, बंडखोरांचा राजधानीवर ताबा

0
4

>> 11 दिवसांपासून सुरू असलेले गृहयुद्ध अखेर संपुष्टात

सीरियामध्ये गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेले गृहयुद्ध संपुष्टात आले असून बंडखोर सैनिकांनी राजधानी दमास्कवर ताबा मिळवला आहे. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद हे देश सोडून पळून गेले आहेत. पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलाली यांनी बंडखोरांना सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. बशर अल-असार यांचे कुटुंब सीरियात 50 वर्षांहून अधिक काळ सत्तेवर होते. बशरचे वडील हाफिज अल-असाद 1971 मध्ये सीरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि पुढील 29 वर्षे ते देशाचे राष्ट्राध्यक्ष राहिले. त्याच्या मृत्यूनंतर बशर यांनी 2000 मध्ये सीरियाची कमान हाती घेतली.

सीरियावर बंडखोरांनी ताबा मिळवल्यामुळे अखेर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांच्या कुटुंबाची कित्येक दशकांची राजवट संपुष्टात आली आहे. बंडखोरांनी सार्वजनिक रेडिओ आणि टीव्ही इमारतीवरही ताबा मिळवला आहे. येथून ते नव्या सरकारची घोषणा करू शकतात. सध्या हे बंडखोर शहरात हवेत गोळीबार करून आनंद साजरा करत आहेत.

बंडखोर कोण?
हयात तहरीर अल-शाम संघटना 2011 मध्ये अल-कायदाची थेट सहयोगी म्हणून जबात अल-नुसरा नावाने स्थापन करण्यात आली होती. जिहादी विचारसरणीची असलेली ही संघटना राष्ट्राध्यक्ष असद यांच्या विरोधात असलेल्या संघटनांपैकी सर्वात प्रभावी आणि प्राणघातक मानली जाते. 2016 मध्ये हयात तहरीर अल-शाम संघटनेचे नेते अबू मोहम्मद अल-गोलानी यांनी अल-कायदाशी संबंध तोडून, कट्टर अधिकाऱ्यांची सुटका करत बहुलवाद आणि धार्मिक सहिष्णुता स्वीकारण्याची शपथ घेतल्यानंतर संघटनेची प्रतिमा पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या संघटनेने उत्तर-पश्चिम सीरियाचा बराचसा भाग पूर्वीच नियंत्रणाखाली घेतला आहे. त्यांनी 2017 मध्ये या प्रदेशातील दैनंदिन व्यवहार चालविण्यासाठी सरकार देखील स्थापन केले आहे. इस्लामिक स्टेटने केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे सीरियामध्ये व्यापक खिलाफतऐवजी कट्टरतावादी इस्लामिक शासन स्थापन करणे हे संघटनेचे ध्येय आहे. अबू मोहम्मद अल जोलानी हा या सीरियातील या बंडाचा सूत्रधार आहे. त्याने स्वत: आपले सैन्य रस्त्यावर उतरवले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शहरे काबीज करत आहे. त्याचे कारनामे इतके धोकादायक आहेत की, अमेरिकेनेही त्याच्यावर 10 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.
युके, जर्मनी, फ्रान्सकडून स्वागत
पाश्चिमात्य देशांनी बशर अल-असद यांची राजवट संपुष्टात आल्याने या देशांनी याचं स्वागत केले आहे.

बंडखोरांच्या बाजूने लोक रस्त्यावर

सीरियातील परिस्थिती अधिक चिंताजनक होत चालली आहे कारण आता सरकारच्या ताब्यातील भागही बंडखोरांनी त्यांच्या ताब्यात घेतले आहेत. बंडखोरांनी उत्तर आणि पूर्व होम्समधील अनेक सरकारी सीमा उद्ध्वस्त केल्या आहेत. होम्स शहरातून सैन्य माघार घेतल्यानंतर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यानंतर त्यांनी असाद गेले, होम्स मुक्त झाले अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.

कैद्यांची सुटका

सीरियातील सर्वात कुख्यात तुरुंग सैदनायामधून कैद्यांना सोडण्याचा कट रचला जात असल्याचेही वृत्त आहे. विरोधी पक्षाचे अनेक नेतेही या तुरुंगात असल्याचे सांगितले जात आहे.

अनेक शहरे ताब्यात

सीरियात सत्तापालटाच्या हालचालींनी वेग घेतला असून, देशातील अनेक शहरे बंडखोरांनी ताब्यात घेतली आहेत. राष्ट्राध्यक्ष असद अल बशर देश सोडून रशियाला पळून गेले आहेत. बंडखोरांनी देशाच्या लष्कराचे रणगाडेही ताब्यात घेतले आहेत.