सीरियातील सत्तांतर

0
11

सीरियामधील बशर अल असद यांची सत्ता उलथवून बंडखोरांनी आधीच जागतिक आणि प्रादेशिक महासत्तांच्या आपसातील संघर्षाचा बळी ठरलेल्या त्या देशात नवी अस्थिरता आणि अनिश्चितताच निर्माण केलेली आहे. भले, असद घराण्याची पाच दशकांची हुकूमशाही सत्ता उलथवली गेली असेल, परंतु म्हणून सीरियामध्ये लोकशाही राज्यप्रणाली सुरू होईल आणि सारे काही आलबेल होईल अशी आशा करण्यात काही अर्थ नाही. जे लिबिया आणि इराकमध्ये झाले, तेच सीरियाच्या कपाळी दिसते. मुळात ज्या बंडखोर गटाने असद यांची सत्ता उलथवली, तो हयात ताहरीर अल शाम हा गट आणि त्याचा नेता अबु महमद अल जोलानी हा एकेकाळी अल कायदाशी संबंधित होता. त्यांनी नंतर त्यापासून फारकत जरी घेतली असली, बंडखोरांचा नेता जोलानी हा अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या यादीतील कुख्यात दहशतवादीच आहे हे विसरून चालणार नाही. एकेकाळी पित्याच्या आसनावर बसण्यासाठी बशर यांना पुढे यावे लागले होते, तेव्हा त्यांच्यासारख्या पाश्चात्त्य राष्ट्रात शिक्षण घेतलेला तरूण सीरियाचे भवितव्य पालटवून टाकील अशी आशा जगाला वाटली होती. बशर यांनी सीरियाची अर्थव्यवस्था खुली केली, मॉल आणि रेस्तराँ देशात दिसू लागली, परंतु त्यांच्या सत्तेला जेव्हा हादरे बसू लागले तेव्हा आपल्या पित्याच्याच मार्गाने बशर गेले. त्यांच्या रूपाने पुन्हा एका हुकूमशहाचाच सीरियात उदय झाला. आता तुर्कियेच्या पाठबळावर ह्या बंडखोरांनी असद राजवट उलथवली असली आणि त्यामुळे गेल्या चौदा वर्षांतील यादवी एका नव्या वळणावर येऊन पोहोचली असली, तरी त्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी शक्तिकेंद्रे कायम असल्याने पुढे काय हा मोठा प्रश्न सीरियापुढे निश्चितच उभा आहे. सीरियाच्या उत्तर भागामध्ये कुर्दिशांचा वरचष्मा आहे. कुर्दीश बंडखोरांना आजवर अमेरिकेचा पाठिंबा राहिला आहे. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आजवर अमेरिका त्यांना बळ देत आली आहे. पूर्व सीरियातील भाग इस्लामिक स्टेटने बळकावून तेथे खिलाफतही जाहीर केली होती. राष्ट्राध्यक्ष असद यांनी आपल्या राजवटीत विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी रासायनिक हल्ले करायलाही कमी केले नव्हते. त्यामुळे अमेरिकेने फ्रान्स व ब्रिटनच्या साह्याने असद यांच्या फौजांवर हवाई हल्लेही पूर्वी केले होते. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असतानाच त्यांनी सीरियावर पाच डझन टॉम हॉक क्षेपणास्रे डागली होती. आयसिसशी लढण्यासाठी कुर्दिशांचा वापर अमेरिका करीत आली आहे. अशा वेगवेगळ्या शक्तिकेंद्रांमध्ये विभागल्या गेलेल्या सीरियाची सत्ता जरी आता असद राजवटविरोधी बंडखोरांच्या ताब्यात गेलेली असली आणि सत्तांतरानंतर त्यांनी देशामध्ये धार्मिक, वांशिक विविधतेची जपणूक करण्याची ग्वाही जरी दिलेली असली, तरीही ड्रुझ, शिया, सुन्नी, अलावाईटस्‌‍, ख्रिस्ती अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये नव्या सत्ताधाऱ्यांबाबत तो विश्वास निर्माण होऊ शकेल का हा प्रश्नच आहे. आजवर असद यांची राजवट इराण आणि रशियाच्या पाठबळावर निर्धोकपणे राज्य करीत राहिली. ‘अरब स्प्रिंग’ म्हणून ज्याचा उल्लेख होतो, त्या अरब देशांत उफाळलेल्या राज्यक्रांतीच्या वादळातूनही असद त्यांच्याच मदतीने बचावले होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत रशिया युक्रेनशी लढण्यात अडकला आहे. इराण आणि त्याची हस्तक असलेली हिज्बुल्ला ह्यांना इस्रायलने जरबेत ठेवले आहे. कुर्दिशांच्या पाठीशी राहणारी अमेरिका सत्तांतराच्या वाटेवर आहे. त्यामुळे आपल्यासाठी ही योग्य वेळ आहे हे हेरून बंडखोरांनी असद राजवट उलथवण्याच्या दिशेने निर्णायक प्रयत्न सुरू केले आणि सद्यपरिस्थितीत एकाकी पडलेल्या असद यांची सत्ता बघता बघता उलथवली. आता असद रशियाच्या आश्रयाला गेल्याच्या बातम्या आहेत. पण सीरियाचे भवितव्य काय हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. बंडखोरांना तुर्कियेचे पाठबळ जरी असले, तरी सीरियामधून येणारे लाखो निर्वासितांचे लोंढे ही तुर्कियेची मोठी डोकेदुखी आहे. यापूर्वी तुर्कियेच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या एका निर्वासित सीरियन मुलाच्या छायाचित्राने जगाचे अंतःकरण हेलावून सोडले होते. जागतिक महासत्तांच्या संघर्षामध्ये सीरियासारखे देश होरपळून गेले आहेत. लाखो लोक आजवर बळी गेले, लाखो निर्वासित झाले. आज सीरियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. तेथे जी नवी राजवट आता येणार आहे, ती कडव्या सुन्नींची असल्याने तेथील इतर अल्पसंख्यकांचे काय होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे सीरियातील सद्यघडामोडींकडे सावधपणेच पाहावे लागेल. एका हुकूमशहाच्या राजवटीचा जरी अस्त झाला असला, तरी नवे हुकूमशहा निर्माण होणार नाहीत ना हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरीतच आहे.