सीरियामध्ये बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांची राजवट उलथवून टाकली. त्यानंतर असद हे विमानाने रशियाला पळून गेले आहेत. त्यामुळे तब्बल 13 वर्षांनी सीरियामधील गृहयुद्ध अखेर संपले आहे. बंडखोरांनी राजधानी दमास्कस ताब्यात घेतल्यानंतर इस्लामचा कट्टरपंथी समूह हयात तहरीर अल शाम या गटाचे बंडखोर असद यांच्या राजवाड्यात घुसले. येथे त्यांनी असद यांच्या संपत्तीची मनसोक्त लूट केल्याचे पाहायला मिळाले.
असद यांच्या महालातील लुट सुरू असतानाचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये असद यांच्या महागड्या गाड्यांचे कलेक्शनदेखील दिसून येत आहे. ज्यामध्ये फरारी, ॲस्टन मार्टिन, रोल्स रॉइस आणि बीएमडब्लू अशा प्रसिद्ध कंपन्यांच्या अनेक लक्झरी कार दिसून येत आहेत.
असद यांच्या राजवाड्यात घुसलेले बंडखोर फर्निचर आणि अन्य साहित्य लुटताना व्हायरल व्हिडिओंमध्ये दिसत आहेत, तर काही जण सेल्फी घेताना तसेच बंदुकींबरोबर उभे राहून फोटो काढताना दिसत आहेत.
सायदनाया तुरुंगातून कैद्यांची सुटका
याबरोबरच सीरियन बंडखोरांनी सायदनाया तुरुंग देखील उजेडात आणला आहे. हा तुरुंग कैद्यांना क्रूर वागणूक देण्यासाठी ओळखले जातो. असद यांच्या राजवटीत या तुरुंगामध्ये हजारोंच्या संख्येने लहान मुले, महिला आणि पुरुषांना त्रास सहन करावा लागला. लहान मुलांसह अनेक कैद्यांना जमिनीखाली असलेल्या या तुरुंगात कित्येक वर्षे छळ आणि उपासमार सहन करावी लागली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये बंडखोर या तुरुंगाचे दरवाजे फोडून आतमधील कैद्यांना मुक्त करताना दिसत आहेत.
भारताची पहिली प्रतिक्रिया
सीरियातील या सर्व घडमामोडींनंतर भारत सरकारने पहिल्यांदाच तिथल्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की सीरियामध्ये चालू असलेल्या घडामोडींवर, तिथल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तिथे घडणाऱ्या घडामोडी पाहता सीरियाची एकता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता जपण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आम्ही सीरियन नागरिकांच्या, तिथल्या सर्व वर्गांच्या, सर्व प्रकारच्या हितसंबंधांचे रक्षण करणाऱ्या शांततापूर्ण व सर्वसमावेशक राजकीय प्रक्रियेचे समर्थन करतो. दमास्कसमधील आमचा दूतावास सीरियामधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या संपर्कात आहे, असेही स्पष्ट करण्यात
आले आहे.