सीमेवर शांतता राखण्यास प्राधान्य ः मोदी

0
5

>> ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी व चीन राष्ट्राध्यक्षांची भेट

गेल्या 4 वर्षात भारत-चीन सीमेवर निर्माण झालेल्या समस्यांवर दोन्ही देशांत जे एकमत झाले आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. सीमेवर शांतता राखणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेत सांगितले. रशियाच्या कझान शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते. कझान येथे ब्रिक्स परिषदेचा काल दुसरा दिवस होता. 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली द्विपक्षीय बैठक होती.

पंतप्रधान मोदी यांनी, ब्रिक्स देशांना दहशतवादाविरोधात एकत्र लढावे लागेल. यावर दुटप्पीपणा नसावा, असे सांगून गेल्या दोन दशकांत संस्थेने अनेक यश संपादन केले आहे. आता ब्रिक्स हे जागतिक आव्हानांसाठी अधिक प्रभावी माध्यम म्हणून उदयास येईल असा विश्वास व्यक्त केला. आम्ही युद्धाचे नव्हे तर संवाद आणि मुत्सद्देगिरीचे समर्थन करतो आणि आम्ही एकत्रितपणे कोविडसारख्या आव्हानाला पराभूत केले. त्याच प्रकारे, भावी पिढ्यांसाठी सुरक्षित, सशक्त आणि समृद्ध भविष्यासाठी नवीन संधी निर्माण करण्यास आम्ही पूर्णपणे सक्षम असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

यावेळी जिनपिंग यांनी, दोन्ही देशांनी आपले मतभेद योग्य पद्धतीने हाताळले पाहिजेत, असे सांगितले. भारत आणि चीनने संबंध सामान्य ठेवण्यासाठी एकमेकांसोबत काम केले पाहिजे. तरच दोन्ही देश विकासाचे लक्ष्य गाठू शकतील असे जिनपिंग पुढे म्हणाले. जिनपिंग यांनी, जग अशांत बदलांमधून जात आहे. आपल्याला शांततापूर्ण ब्रिक्स निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यात सुमारे 50 मिनिटे चर्चा झाली. ब्रिक्स बैठकीच्या बाहेर हे संभाषण झाले.